एमटीएनएलला साडेसहा टक्के तोटा
By Admin | Updated: September 5, 2016 03:33 IST2016-09-05T03:33:29+5:302016-09-05T03:33:29+5:30
मागील तीन वर्षांपासून साडेसहा टक्के तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती खासदार राजन विचारे यांनी येथील कार्यालयात घेतलेल्या आढाव्याअंती उघड झाली.

एमटीएनएलला साडेसहा टक्के तोटा
ठाणे : केंद्र शासनाच्या नियंत्रणातील ठाण्यात कार्यरत असलेले महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) कार्यालय मागील तीन वर्षांपासून साडेसहा टक्के तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती खासदार राजन विचारे यांनी येथील कार्यालयात घेतलेल्या आढाव्याअंती उघड झाली.
येथील चरई येथे कार्यरत असलेल्या एमटीएनएल कार्यालयाचा मागील तीन वर्षांचा आढावा घेण्यात आला. या कार्यालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून विचारे यांनी ही बैठक घेतली असता त्यास एमटीएनएलचे मुंबई पूर्व २ या विभागाचे उपाध्यक्ष ए.एन. उपाध्याय हे उपस्थित होते. मागील तीन वर्षांच्या वार्षिक आढाव्यातील तोट्याची कारणे मात्र संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांना या वेळी सांगता आली नाहीत. त्यामुळे महानगर टेलिफोन निगमचा कारभार ढिसाळ असल्याची नाराजी विचारे यांनी या वेळी व्यक्त केली.
कोणीही विकत घेत नसलेले स्पेक्ट्रम २००८ रोजी एमटीएनएलकडे सुपूर्द करण्यात आले. परंतु, त्यासाठी झालेला नफा व बँकेचे कर्ज असे एकूण चार हजार ५०० कोटी रु पये खर्ची पडल्यानंतर ३ जी सर्व्हिस देता न आल्यामुळे सदरची रक्कम बुडीत निघाली. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या वेळी स्मार्ट फोन भरपूर महागडे असल्यामुळे एमटीएनएलचे ग्राहक ते खरेदी करू शकत नव्हते व त्याच कारणाने ३ जी सर्व्हिस लोप पावत गेली.
एमटीएनएलमध्ये सुधारणा होईपर्यंत कोणीही सल्लागार समितीचे मानधन घेणार नसल्याचा ठराव या वेळी एकमताने करण्यात आला. या बैठकीस एमटीएनएलचे वरिष्ठ प्रबंधक टी.बी. भोसले, उपमहाप्रबंधक एस.पी. पाटील, जानकी रामन, सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र महाडिक, शेषराव चक्र नारायण, जितेंद्र दुबल, किरण शहा उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
>नेटवर्कसाठी टॉवर हवेत
एमटीएनएलच्या ग्राहकास नेटवर्क मिळत नसल्याची मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी ६०० बीटीएस टॉवर्र्स उभारण्याची गरज आहे.
याशिवाय, या सेवेसाठी अपुरी साधनसामग्री व केंद्रीय निधीचा अभाव आदींसाठी दूरसंचार विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असून जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांची ताबडतोब डागडुजी करण्यासाठीदेखील या बैठकीत चर्चा झाली.