फाळके चित्रनगरीत ‘एमएसडी’

By Admin | Updated: March 3, 2015 01:22 IST2015-03-03T01:22:45+5:302015-03-03T01:22:45+5:30

महाराष्ट्राला रंगभूमीची परंपरा आहे. रंगभूमीची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी शासन बांधील आहे.

'MSD' in Phalke illustration | फाळके चित्रनगरीत ‘एमएसडी’

फाळके चित्रनगरीत ‘एमएसडी’

पुणे : महाराष्ट्राला रंगभूमीची परंपरा आहे. रंगभूमीची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी शासन बांधील आहे. सध्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून ती चालवण्यास दिली जाणार आहे. या चित्रनगरीत एनएसडीच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा (एमएसडी) संस्था सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे केली.
राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’, तर प्रसिद्ध नाट्यसंगीत गायिका कीर्ती शिलेदार यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात माजी नाट्य संमेलनाध्यक्ष अरुण काकडे आणि ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. शासनातर्फे वृद्ध कलाकारांना देण्यात येणाऱ्या आॅनलाईन अनुदान उपक्रमाचा या वेळी शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, सांस्कृतिक संचालनालयाचे उपसचिव संजय भोकरे, विजया पणशीकर उपस्थित होत्या.
तावडे म्हणाले, ‘‘या चित्रनगरीमध्ये नूतनीकरणाचा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी २२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या ठिकाणी एमएसडी उभारण्याबरोबरच देशविदेशातील अनेक नाटके रसिकांना पहाता येतील.’’ राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगभूमीचे प्रशिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज असे हॉस्टेल विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हॉस्टेलमध्ये २५० विद्यार्थ्यांची व्यवस्था होईल.’’ सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. सौरभ गोडबोले आणि नूपुर चितळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

प्रभाकर हा अतिशय देखणा, प्रतिभावंत आणि अचूक टायमिंग असलेला नट होता. आपल्या खर्ज्याच्या आवाजाची झालेली जाणीव त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली, अशी त्यांच्याविषयीची आठवण श्रीकांत मोघे यांनी सांगितली. काशिनाथ घाणेकर हे त्या वेळी फॉर्मात होते. त्यांच्या ओळखीचे मैत्रीमध्ये रूपांतर झाले आणि त्यांच्यामुळे नाट्यसंपदेमध्ये काम करण्याचा प्रथम योग जुळून आला. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी मोघे यांना मानवंदना देण्यासाठी अशोक समेळ आणि उदय सबनीस यांनी ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकातील एक प्रसंग सादर केला.

संगीतमय नाटकांची ‘कीर्ती’....
अण्णासाहेब हे रंगभूमीवरील महान द्रष्टे कलाकार होते. संगीत व नाट्य हे तुल्य्बळ असावे, असा त्यांचा विचार होता. लोकसंगीत, लावणी, कीर्तन यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे संगीत त्यांनी मराठी रंगभूमीवर आणले. संगीत नाटक हे त्यांचे जीवनध्येय होते. शिलेदार कुटुंब बनले ते अण्णासाहेबांच्या ‘शाकुंतल’मुळे, अशी भावना कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली. या वेळी ‘संगीत सौभद्र’मधील ‘वद जाऊ कुणाला शरण ’ हे नाट्यपद अश्विनी गोखले यांनी सादर केले.

शासनाने कलाकारांकडे गेले पाहिजे
४वृद्ध कलाकारांना सध्या काहीसे तुटपुंजे अनुदान दिले जात आहे, हे मान्य असले तरी तो त्यांचा हक्क आहे. रंगभूमीसाठी भरीव योगदान दिलेल्या या कलाकारांनी नाट्यसंस्कृती पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी अविरत कष्ट उपसलेले आहेत. त्यामुळे हे अनुदान देण्यासाठी शासनाने कलाकारांकडे गेले पाहिजे. कलाकारांनी शासनाचे उंबरठे झिजवणे, हा त्यांचा अवमान आहे.
४रंगभूमी केलेली मंडळी नंतर मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसतात. पण, रंगभूमीची लोकप्रियता वाढवली पाहिजे. कलाकारांच्या मनातील रंगभूमीचे चित्र प्रत्यक्षात साकारण्यासाठी मुंबईचे रवींद्र नाट्य मंदिरातील वरचे सभागृह हे रंगभूमीसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिले जाईल, असेही ते म्हणाले.

 

Web Title: 'MSD' in Phalke illustration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.