मिसेस सीएमच्या सूचनांचे गांभीर्य नाही!
By Admin | Updated: June 22, 2014 00:56 IST2014-06-22T00:56:29+5:302014-06-22T00:56:29+5:30
प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. आता यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयही (मेडिकल) सुटले नाही. विशेष म्हणजे,

मिसेस सीएमच्या सूचनांचे गांभीर्य नाही!
मेडिकल : रुग्णाला भरावे लागले पैसे
नागपूर : प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. आता यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयही (मेडिकल) सुटले नाही. विशेष म्हणजे, दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्त्वशीला चव्हाण यांनी नुकतीच मेडिकलची पाहणी केली. या पाहणीत एका गरीब रुग्णाने पैसे नसल्याच्या कारणावरून उपचार लांबल्याची कैफियत मांडली. त्या रुग्णावर तत्काळ मोफत उपचार करण्याची सूचना मिसेस सीएम यांनी केली. मात्र याला कोणीच गांभीर्याने घेतले नाही. यामुळे तो गरीब रुग्ण उसनवारी करून उपचार घेत आहे. यावरून मेडिकलमध्ये खरंच गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिसेस सीएम यांनी १४ जून रोजी अचानक मेडिकलची पाहणी केली. कुठलाही गाजावाजा न करता ही पाहणी झाली. मिसेस सीएम यांनी अपघात विभागापासून ते बाह्यरुग्ण विभाग, विविध वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष अशा एकूण २० ठिकाणी भेटी दिल्या. तब्बल पावणेदोन तास त्यांचे निरीक्षण सुरू होते.
प्रत्येक रुग्णाजवळ जाऊन काय झाले, उपचार बरोबर मिळतो आहे ना, अशी आस्थेने चौकशी करीत होत्या. याच वेळी तालुका हिंगणा अडेगाव येथील माजी सरपंच असलेले रामचंद्र बाजनघाटे यांनी मिसेस सीएम यांना थांबवून आपली कैफियत मांडली. मुलगा क्रिष्णाला हृदयविकाराचा झटका आल्याने तो अतिदक्षता विभागात भरती आहे. औषधांवर चार-पाच हजार रुपये खर्च झाले. आता डॉक्टर म्हणतात, अँजिओग्राफी करावी लागेल. त्यासाठी पाच हजार रुपये खर्च येईल. पैसे नसल्याने अँजिओग्राफी होत नाही, यावर्षी शेतीही बुडाली. काय करावे, असे म्हणत त्यांनी हात जोडले. यावर मिसेस सीएम यांनी काळजी करू नका, असा धीर दिला. अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना मदत करण्याची सूचना केली.
त्याच वेळी मिसेस सीएम यांनी अतिदक्षता विभागात जाऊन क्रिष्णाच्या प्रकृतीची चौकशीही केली, मात्र मिसेस सीएम जाताच बाजनघाटे यांच्याशी कोणीच संपर्क साधला नाही.
अखेर त्यांनी उसनवारीने पैसे आणून सुपर स्पेशालिटीमध्ये पाच हजार रुपये भरले. अँजिओग्राफी झाली.
परंतु आता डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्यास सांगितले. याला साधारण ६० हजाराच्यावर खर्च येत असल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
‘लोकमत’शी बोलताना बाजनघाटे म्हणाले, उसनावारी करून कसेतरी उपचार सुरू होते. त्यात मिसेस सीएम यांनी डॉक्टरांना मोफत उपचार करण्याची सूचना दिल्याने दिलासा मिळाला होता, मात्र त्यानंतर कुणीच लक्ष दिले नाही. (प्रतिनिधी)