मिसेस सीएम मेडिकलमध्ये!

By Admin | Updated: June 15, 2014 00:44 IST2014-06-15T00:44:14+5:302014-06-15T00:44:14+5:30

मेडिकलला आतापर्यंत ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांच्याकडून झाले नाही ते दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्वशीला चव्हाण यांनी करून दाखविले. आज शनिवारी त्यांनी मेडिकलच्या अपघात विभागापासून

Mrs CM Medical! | मिसेस सीएम मेडिकलमध्ये!

मिसेस सीएम मेडिकलमध्ये!

पावणे दोन तासात पिंजून काढले रुग्णालय : ओपीडीपासून ते ओटीची केली पाहणी
नागपूर : मेडिकलला आतापर्यंत ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांच्याकडून झाले नाही ते दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्वशीला चव्हाण यांनी करून दाखविले. आज शनिवारी त्यांनी मेडिकलच्या अपघात विभागापासून ते बाह्यरुग्ण विभाग, विविध वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष अशा एकूण २० ठिकाणी भेटी दिल्या. मेडिकलच्या समस्या जाणून घेतल्या. पाहणीत ज्या-ज्या रुग्णांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या त्यांच्या समस्या त्याच वेळी सोडविल्या. एवढेच नाही तर त्या किचनमध्ये जाऊन भांडी कशी साफ ठेवायची, याचा कानमंत्रही दिला. कुठेही न बसता, तब्बल पावणे दोन तासात त्यांनी अर्धेकअधिक मेडिकल पिंजून काढले.
मेडिकलमध्ये व्हीआयपी येणे हे नवीन नाही. परंतु आतापर्यंत ते एखाद्या कार्यक्रमासाठी, विभागाच्या किंवा यंत्राच्या उद्घाटनासाठी आणि विशिष्ट रुग्णाची पाहणी करण्यासाठी येत असत. मात्र मिसेस सीएम यांनी केलेल्या पाहणीने आज सर्वच थक्क झाले. दुपारी १२ वाजता त्या मेडिकलच्या अपघात विभागात दाखल झाल्या. कुठेही न थांबता थेट सीएमओ कक्षात गेल्या. उपस्थित डॉक्टरांना औषधांविषयी विचारले. तिथून त्या बाह्यरुग्ण विभागात आल्या. शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत होते. त्यांना ‘डिस्टर्ब’ न करता वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांच्याकडून माहिती घेतली. तिथून त्या सायकॅट्रिक विभाग, ईसीजी कक्ष, एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग आणि स्त्री रोग व प्रसूती विभागात गेल्या. या विभागातील महिला रुग्णांची आस्थेने चौकशी केली. डॉक्टरांकडून येथील समस्या जाणून घेतल्या. याच विभागाच्या वॉर्ड क्र. २१ आणि २२ मध्येही त्यांनी भेट दिली. प्रत्येक रुग्णाजवळ जाऊन काय झाले, उपचार बरोबर मिळतो आहे ना, अशी आस्थेने चौकशी केली. तिथून त्या वॉर्ड क्र.२३ मध्ये आल्या. वैद्यकशास्त्र विभागाचा हा वॉर्ड रुग्णाने फुल्ल होता. ते पाहून किती रुग्ण आहेत, याची चौकशी परिचारिकेकडे केली. ४० खाटा ४६ रुग्ण असा आकडा परिचारिकेने दिला. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, धावपळ होत असली तरी सर्वांकडे लक्ष ठेव असा सल्ला दिला. त्यानंतर वॉर्ड क्र. २४ अतिदक्षता विभागात आल्या. तेथील गंभीर रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शस्त्रक्रिया कक्ष ‘ओटी-जी’च्या आत जाताना त्यांनी गाऊन चढवला. चप्पल काढून ठेवली. नंतर वॉर्ड क्र. २५, पेर्इंग वॉर्ड त्यातही व्हीव्हीआयपी कक्षाची पाहणी केली. त्यांनी आपल्या पाहणीतून किचनही सोडले नाही. पहिल्या मजल्यावरी किचनमध्ये पायऱ्या चढून त्या गेल्या. आज मेनू काय, असा प्रश्न विचारीत त्यांनी सफाईकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
नवजात शिशू विभागाच्या वॉर्ड क्र. ८ मध्ये आल्या तेव्हा नवजात शिशूला कवटाळून बसलेल्या सर्व मातांशी त्यांनी चौकशी केली. धीर दिला. तुझे बाळ बरे होईल, असा विश्वास दिला. वॉर्ड क्र. ३ मधील थॅलेसिमिया आणि सिकलसेलच्या डे-केअर सेंटरची पाहणी केली. बालरोग अतिदक्षता विभाग, नवजात शिशू विशिष्ट सेवा विभागाचीही त्यांनी पाहणी केली. (प्रतिनिधी)
रुग्णांशी संवाद साधा
वॉर्ड क्र. २३ची पाहणी करून बाहेर पडत असताना एका तरुणीने डॉक्टर रुग्णाकडे लक्ष देत नसल्याची तक्रार केली. त्या तरुणीचा हात पकडीत पुन्हा वॉर्ड २३ मध्ये गेल्या, तेथील डॉक्टराला याचा जाब विचारला. भांबावलेल्या त्या डॉक्टराने तो रुग्ण हृदयविकाराचा आहे, त्याला सलाईन लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु त्याचे दोन्ही हात सुजलेले असल्याने नस सापडत नाही. भूलतज्ज्ञांना कळविले आहे. या वाक्याने मिसेस सीएम यांचे समाधान होताच, त्या तरुणीला डॉक्टर आपले काम करीत असल्याचे सांगून ओरडू नका, त्यांना सहकार्य करा असा सल्ला दिला. त्याचबरोबर संबंधित डॉक्टरलाही रुग्णाशी संवाद वाढवा, अशी सूचना केली.

Web Title: Mrs CM Medical!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.