एमपीएससीचा ‘बाजार’

By Admin | Updated: June 8, 2015 01:51 IST2015-06-08T01:51:47+5:302015-06-08T01:51:47+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) बनावट प्रश्नपत्रिका १५ लाखांत विकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादेतून रविवारी पहाटे गजाआड केले.

MPSC's 'market' | एमपीएससीचा ‘बाजार’

एमपीएससीचा ‘बाजार’



औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) बनावट प्रश्नपत्रिका १५ लाखांत विकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादेतून रविवारी पहाटे गजाआड केले. याच बंगल्यात प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली.
प्रतापसिंग काकरवाल हा या टोळीचा म्होरक्या असून, मिर्झा मोहसीन अहेमद , रोहित गिरी , नीलेश वाघ , गणेश मैद , रामेश्वर पवार , भोलेशंकर साबळे आणि परीक्षार्थी अर्जुन बमनावत, कृष्णा मारक , ओमनाथ ऊर्फ किशोर राठोड , संदीप मातेरे , संदीप शिंदे , भानुदास बोर्डे , दत्तात्रय गोराडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काकरवाल याच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपवरून बनावट प्रश्नपत्रिका पाठविणारा श्रीनिवास बनसोडे मात्र, फरार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ७ जून रोजी विक्रीकर निरीक्षक पदाकरिता स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती़ या परीक्षेची प्रश्नपत्रिका काही परीक्षार्थींना पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस दोन दिवसांपासून टोळीच्या मागावर होते. शनिवारी रात्री साडेदहा वाजता सुरू झालेली शोधमोहीम रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सिडको एन-४ मधील समृद्धीनगरातील एका घरावर येऊन थांबली. या घराच्या प्रवेशद्वारावर दोन बाऊंन्सर, तर घरात अन्य १२ जण होते. यातील सहा जण प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करीत होते. या सर्वांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरूद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

प्रत्येकी पंधरा लाखांत सौैदा
काकरवाल याने परीक्षार्थीना फसविण्याच्या उद्देशानेच त्यांना लोकसेवा आयोगाची प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे खोटे सागितले. त्याकरिता त्याने काही एजंटही नेमले होते. एजंटमार्फत ७ जून रोजी कर सहायक परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचा त्याने शोध घेतला. यात आठ उमेदवार त्याच्या गळाला लागले. फरारी बनसोडे याने काकरवालच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे प्रश्नपत्रिका संच पाठविला. याच्या बदल्यात प्रत्येक उमेदवारासोबत बारा ते पंधरा लाख रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला गोपनीय अहवाल
एमपीएससीची ही परीक्षा सकाळी दहा ते दुपारी एक वाजेदरम्यान होती. पण सकाळी सात वाजता पोलिसांनी प्रश्नपत्रिकेच्या सत्यतेबाबत खात्री करण्याकरिता जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्याकडे गोपनीय अहवाल पाठविला. पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली. आयोगाकडून प्राप्त झालेल्या विविध प्रश्नपत्रिकांचा संच आणि जप्त केलेली प्रश्नपत्रिकेची पडताळणी करण्यात आली. त्यात जप्त केलेला संच पूर्णत: वेगळा असल्याचे समोर आले.

Web Title: MPSC's 'market'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.