Sanjay Raut on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत टीका केली आहे. ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करता आणि मग उपमुख्यमंत्री पदाची शपथ देता हे कोणत्या संविधानात लिहिलं आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. संसदेमध्ये संविधानावर दोन दिवसीय चर्चा आयोजित केली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून आज संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.
संसदेतल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यघटनेवर हल्ले चढविण्याची एकही संधी नेहरू-गांधी कुटुंबाने सोडलेली नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुनच आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. सिंचन घोटाळा करणारे पंतप्रधान मोदींच्या मांडीवर बसलेत असा आरोप संजय राऊत यांनी केला.
"ईडी, सीबीआय भाजपच्या घरी गेली आहे असं दाखवावं. उलट ज्यांच्या घरी गेली होती ते आज मोदींच्या मांडीवर बसले आहेत. आईच्या ममतेने मोदी त्यांची काळजी घेत आहेत. ७०००० कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी आरोप केला होता त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानामध्ये लिहिलेले आहे," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
"धनंजय चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल व्हायला हवा"
"ज्या पद्धतीने राज्यातील सरकारमधील आमदार फोडले, १०व्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरले पाहिजेत. मात्र नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाने, चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. हे काय संविधानात बसतं का? चंद्रचूड यांच्यावरती खरंतर खटला दाखल केला पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले.