चित्रपट, सामाजिक क्षेत्राची...सडक सुनी!
By Admin | Updated: November 4, 2014 02:32 IST2014-11-04T02:32:14+5:302014-11-04T02:32:14+5:30
सदाशिव अमरापूरकर यांचा उल्लेख होताच त्यांच्या चाहत्यांना दोन चित्रपट हमखास आठवतात. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘अर्धसत्य’ आणि महेश भट दिग्दर्शित ‘सडक’

चित्रपट, सामाजिक क्षेत्राची...सडक सुनी!
अनुज अलंकार, मुंबई
सदाशिव अमरापूरकर यांचा उल्लेख होताच त्यांच्या चाहत्यांना दोन चित्रपट हमखास आठवतात. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘अर्धसत्य’ आणि महेश भट दिग्दर्शित ‘सडक’. ‘सडक’मध्ये त्यांनी साकारलेली ‘तृतीयपंथी महारानी’ विशेष गाजली. असे असले तरी ‘अर्धसत्य’ आणि ‘सडक’ या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका खलनायकी होत्या. या दोन्ही भूमिका माइलस्टोन ठरल्या. त्यामुळे बॉलीवूडमध्येही त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. पण खेदाची गोष्ट ही की, त्यांची ओळख नकारात्मक भूमिका करणारा कलाकार म्हणूनच सीमित राहिली. विविधांगी भूमिका करायला त्यांना तिथे फारसा वावच मिळाला नाही. अमरापूरकर फक्त खलनायकाची भूमिका उत्तम वठवू शकतात, असा एक भ्रम हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झाला.
बॉक्स आॅफिसवर एखाद्या कलाकाराचा विशिष्ट धाटणीचा चित्रपट हिट झाला की तोही त्याच साच्यात अडकून पडतो, हा हिंदी चित्रपटसृष्टी आणि पर्यायाने अमरापूरकर यांच्या बाबतीत दैैैवदुर्विलास आहे. अशावेळी कलाकारांकडे दोनच पर्याय उरतात. एक तर वाट्याला येईल ती भूमिका करीत सतत प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करणे; नाहीतर वेगळी भूमिका मिळण्याची वाट पाहणे. जर ती खूप प्रयत्न करूनही मिळालीच नाही तर ती चूक सुधारून पुन्हा जुन्या साच्यात अडकण्याशिवाय पर्याय नसतो. ‘सडक’मधील महाराणीने अमरापूरकरांना लोकप्रियता मिळवून दिली.