मंत्रालयामध्ये घुसून आंदोलन करणार!
By Admin | Updated: January 21, 2017 03:20 IST2017-01-21T03:20:39+5:302017-01-21T03:20:39+5:30
अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या झोपडपट्टीवासीयांनी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला

मंत्रालयामध्ये घुसून आंदोलन करणार!
नवी मुंबई : अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या झोपडपट्टीवासीयांनी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला. डोक्यावरील छप्पर हिरावून जगण्याचा अधिकार नाकारू नका, अन्यथा आता सिडकोसमोर आंदोलन केले, भविष्यात मंत्रालयामध्ये घुसून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा झोपडपट्टीवासीयांनी दिला
सिडको व महापालिकेने शहरातील झोपड्या व चाळींवर कारवाई सुरू केली आहे. तळवलीमधील चाळीमध्ये कारवाई करताना पोलीस बळाचा वापर करण्यात आला. महिला व मुलांनाही मारहाण केली. नागरिकांना घरातून ओढून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या साहित्यासह घरे पाडण्यात आली. एका दिवसामध्ये ८० कुटुंबांना रस्त्यावर यावे लागले. नातेवाइकांच्या सहाऱ्याने व अनेकांना उघड्यावर संसार थाटावे लागले आहेत. आयुष्याची कमाई खर्च करून विकत घेतलेल्या घरांवर सिडकोने हातोडा चालविला. याच पद्धतीने एपीएमसीजवळील एकता नगरमधील ३०० झोपड्या हटविण्यात आल्या. अनेक वर्षांपासून प्लास्टीकच्या सहाय्याने झोपडी उभारून वास्तव्य करणाऱ्या या नागरिकांना बेघर करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या हजारो नागरिकांनी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली सिडकोभवनसमोर आंदोलन केले. आम्हाला विस्थापित करू नका. आमच्या डोक्यावरील छप्पर हिरावून घेवू नका अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. कोकण शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू असल्यामुळे कोणत्याही पक्षाचे झेंडे न घेता रहिवाशांनी आंदोलन केले. विस्थापित झालेल्या नागरिकांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत असल्याचे मत यावेळी खाजामिया पटेल यांनी व्यक्त केले.
सिडकोभवनसमोर आंदोलन करणाऱ्या झोपडपट्टीधारकांनी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याशीच चर्चा करण्याचा आग्रह धरला. गगराणी यांनी भेट दिली नाही तर दिवसभर ठिय्या मारून परत जावू, पण इतर कोणत्याही अधिकाऱ्यांना भेटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेर शिष्टमंडळाला सिडकोभवनमध्ये नेण्यात आले. दालनाच्या बाहेरच व्यवस्थापकीय संचालक भेटल्याने त्यांना निवेदन देण्यात आले. झोपडपट्टीमधील रहिवाशांवर अन्याय केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घर देण्याची घोषणा केली असताना आमच्या हक्काचा निवारा हिरावून घेतला जात आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे राज्य अध्यक्ष काशिनाथ निकाळजे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष खाजामिया पटेल, रायगड जिल्हा अध्यक्ष जीवनराव गायकवाड, सुरेश जाधव, प्रकाश वानखेडे, जयेश पाटील, विठ्ठल जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत झोपडपट्टीमधील रहिवाशांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. आता सिडकोभवनवर धडक दिली आहे पुन्हा येथे येणार नाही. प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर थेट मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा देण्यात आला.
>झोपडपट्टी व चाळीतील विस्थापित झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन सेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. सिडकोने कारवाई केल्यामुळे बेघर झालेल्यांना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल.
- खाजामिया पटेल, अध्यक्ष - रिपब्लिकन सेना, नवी मुंबई
गनिमी काव्याने मंत्रालयात घुसणार
सिडकोने झोपडपट्टीधारकांना न्याय दिला नाही तर सर्व विस्थापितांना घेवून मंत्रालयामध्ये घुसून आंदोलन केले जाईल. गनिमी काव्याने नागरिकांना आतमध्ये प्रवेश मिळवून दिला जाईल व आतमध्ये जावून मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करून या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले जाणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
पक्षाचे झेंडे नाहीत
आचारसंहिता असल्याने पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला होता. पण जनतेच्या हितासाठी आंदोलन करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आंदोलनामध्ये पक्षाचे झेंडे लावणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर परवानगी मिळाली. आंदोलनादरम्यान कोणतेही झेंडे व पक्षाचे चिन्ह घेण्यात आले नाही. गरिबांना न्याय मिळणे महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.