विद्यापीठात आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन

By Admin | Updated: November 24, 2014 03:31 IST2014-11-24T03:31:54+5:302014-11-24T03:31:54+5:30

प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे लढा देणाऱ्या एमफुक्टो संघटनेने पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे

Movement before the Vice Chancellor | विद्यापीठात आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन

विद्यापीठात आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन

मुंबई : प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे लढा देणाऱ्या एमफुक्टो संघटनेने पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील प्राध्यापक सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास १ डिसेंबर रोजी राज्यभरातील हजारो प्राध्यापक आझाद मैदानावर धडक देणार आहेत.
एमफुक्टो संघटनेच्या बैठकीत प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राध्यापकांच्या प्रमुख ९ मागण्यांपैकी एकही मागणी राज्य सरकारकडून मान्य झालेली नाही. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. निवडणुकांमुळे एमफुक्टोने आंदोलन तूर्तास स्थगित केले होते. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ नोव्हेंबरपासून राज्यभरात टप्प्याटप्प्याने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. एमफुक्टोची संलग्न संघटना असलेल्या बुक्टो संघटनेच्या वतीने सोमवारी मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन करण्यात येईल. तर राज्यभरातील विद्यापीठांबाहेरही एमफुक्टोमार्फत आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Movement before the Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.