आमदार परिचारकांविरोधात सैनिकांचे आंदोलन, पंढरपूर बंद
By Admin | Updated: February 22, 2017 13:00 IST2017-02-22T12:53:54+5:302017-02-22T13:00:26+5:30
भारतीय जवानांविरोधात अपशब्द वापरणारे आमदार प्रशांत परिचारक यांचा निषेध करत माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले असून पंढरपूर शहरातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे

आमदार परिचारकांविरोधात सैनिकांचे आंदोलन, पंढरपूर बंद
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २२ - भारतीय जवानांविरोधात अपशब्द वापरणारे आमदार प्रशांत परिचारक यांचा निषेध करत माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले असून पंढरपूर शहरातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज सकाळपासूनच शहरात आंदोलनाचे वातावरण तापले असून बाजारपेठाही बंद आहेत तसेच रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. स्टेशन रोड, नवी पेठ, शिवाजी चौकातील दुकाने तसेच शहरातील पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आले आहेत. आंदोलकांनी परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
'वर्षभर सैनिक गावाकडे नसतो, तो सीमेवर पेढे वाटतो आणि सांगतो काय झाले तर, मला मुलगा झाला’’ असे वादग्रस्त वक्तव्य पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना परिचारक यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. देशाच्या सैनिकांबद्दल व त्यांच्या पत्नींबद्दल असं वक्तव्य करणारा देशद्रोहीच असू शकतो. जर सैनिकांचे मनोबल व्यवस्थित असेल तरच देश सुरक्षित राहू शकतो या गोष्टींचा विचार न करता राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी सैनिकांचा वापर केला जातो. अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्या आमदारकीचा व इतर सर्व पदांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीयांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज हे आंदोलन करण्यात आले असून माजी सैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान परिचारक यांना औरंगाबाद येथे महिला आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.