शिर्डीचे विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या हालचाली
By Admin | Updated: April 15, 2016 02:08 IST2016-04-15T02:08:16+5:302016-04-15T02:08:16+5:30
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत नियुक्त करण्याच्या दिलेल्या शपथपत्राची मुदत गुरुवारी संपली.

शिर्डीचे विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या हालचाली
अहमदनगर : राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत नियुक्त करण्याच्या दिलेल्या शपथपत्राची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होण्याच्या भितीने विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरु असल्याचे सरकारमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ २०१२ मध्ये एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारने बरखास्त केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती सध्या संस्थानचा कारभार पाहत आहे.
साईबाबांच्या महासमाधी शताब्दी महोत्सवाची विविध कामे करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी संस्थानने न्यायालयात परवानगी मागितली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी तीन महिन्यांत व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे शासनाने १४ जानेवारीला न्यायालयात सांगितले होते.
जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता हा धोरणात्मक निर्णय असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरच निर्णय होईल, असे सांगण्यात आले. यापूर्वी २००४ ते २०१२ अशी सलग नऊ वर्षे माजी आमदार व विखे समर्थक जयंत ससाणे हे संस्थानचे अध्यक्ष होते. २०१२ साली केलेल्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे त्या रद्द कराव्या लागल्या होत्या. (प्रतिनिधी)
कदम, कोल्हे
यांची नावे चर्चेत
भाजपाचे माजी आमदार व संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रशेखर कदम यांचे नाव संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. आमदार स्रेहलता कोल्हे यांचेही नाव चर्चेत आहे. अनेक इच्छुकांनी वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेटी घेतल्याचे समजते.
विखे यांचेही विशेष लक्ष शिर्डी संस्थान हे विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे संस्थानवर कोणाची निवड होते, याकडे विखे यांचेही विशेष लक्ष आहे. संस्थानवरील नियुक्त्या लांबणे हे त्यांच्यासाठी सोयीचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.