माफक दरात उत्कृष्ट दर्जाची औषधे पुरविणे एक चळवळ

By Admin | Updated: June 1, 2015 00:31 IST2015-06-01T00:30:58+5:302015-06-01T00:31:38+5:30

जगन्नाथ शिंदे : ‘क्यू मॅप’ची स्वस्त औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत

A movement providing excellent quality medicines at reasonable rates | माफक दरात उत्कृष्ट दर्जाची औषधे पुरविणे एक चळवळ

माफक दरात उत्कृष्ट दर्जाची औषधे पुरविणे एक चळवळ

कोल्हापूर : महागड्या औषधांमुळे अनेकांना औषधांविना आपले प्राण गमवावे लागतात, याचा विचार करून महाराष्ट्र सेफ केमिस्ट अ‍ॅँड डिस्ट्रिब्युटर्स अलायन्स लिमिटेड या केमिस्ट व्यापाऱ्यांच्या ‘क्यू मॅप’ कंपनीने स्वनिर्मित बाजारभावापेक्षा कमी किमतींत औषधे बाजारपेठेत उपलब्ध केली आहेत. केवळ उत्कृष्ट दर्जाची औषधे पुरविणे एवढाच उद्देश नसून ही एक चळवळ आहे, अशी माहिती शनिवारी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे म्हणाले, मुळातच भारतात जेनेरिक औषधेच सर्वसामान्यांना दिली जात आहेत; कारण परदेशात याच औषधांची किंमत शंभर पटींनी अधिक आहे. भारतात किडनी, हृदयरोग, एड्स या रोगांची औषधे परवडत नसल्याने अनेक रुग्ण औषधे घेत नाहीत. परिणामी औषधाविना ते दगावतात. अशा गरीब रुग्णांना परवडतील अशा किमतीत ही औषधे पुरविणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे; म्हणून महाराष्ट्रातील सर्व औषध व्यापाऱ्यांनी एकत्रित येत ‘क्यू मॅप’ या कंपनीमार्फत २६ प्रकारची औषधे राज्यातील सर्व औषध दुकानांत उपलब्ध करून दिली आहेत. ही औषधे देताना राज्य, केंद्र सरकारने नियमित औषधे लिहून दिलेल्याऐवजी ही स्वस्त, पर्यायी औषधे रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी द्यावी. जेणेकरून गरीब रुग्णांना २०० ते ३०० टक्के स्वस्त दरात ती उपलब्ध केली जातील.
सध्या अशी २६ प्रकारची औषधे उपलब्ध केली आहेत. याहीपुढे जाऊन ‘क्यू मॅप’तर्फे कर्करोग, मानसिक रुग्ण, आदी दुर्धर आजारांवरील औषधे उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
गरीब रुग्णांना औषधे परवडत नसल्याने ब्रँडेड औषधांऐवजी पर्यायी असणारी ‘क्यू मॅप’ची स्वस्त दरांतील ही औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत, असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, सचिव संजय शेटे, धवल भरवाडा, मनीष चांदवाडकर, आदी उपस्थित होते. (प्रतनिधी)

युवा पिढीचे भवितव्य धोक्यात
आॅनलाईन औषधविक्रीमुळे आजची तरुणाई धोक्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून नशा येणारी औषधे सहज उपलब्ध होत आहेत. याचबरोबर स्त्री-भू्रण हत्येसाठी लागणाऱ्या औषधांचीही याच माध्यमातून विक्री होत आहे. यामुळे युवा पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. या आॅनलाईन औषधे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.

Web Title: A movement providing excellent quality medicines at reasonable rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.