पेट्रोलपंप चालकांचे आंदोलन तूर्तास मागे
By Admin | Updated: November 5, 2016 00:04 IST2016-11-05T00:04:40+5:302016-11-05T00:04:40+5:30
इंधनवरील कमिशनमध्ये वाढ मिळावी म्हणून इंधन खरेदी बंद केलेल्या पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी अखेर आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.
पेट्रोलपंप चालकांचे आंदोलन तूर्तास मागे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - इंधनवरील कमिशनमध्ये वाढ मिळावी म्हणून इंधन खरेदी बंद केलेल्या पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी अखेर आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.
तेल कंपन्यांसोबत मुंबईत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. लोध म्हणाले की, तूर्तास तरी पेट्रोलपंप चालकांना डिझेलमधील कमिशनमध्ये प्रति लीटर १० पैसे आणि पेट्रोलमधील कमिशनमध्ये प्रति लीटर १३.८ पैशांची वाढ मिळाली आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून ही वाढ लागू होईल. मात्र वाढ पुरेशी नसून पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांसाठी एक समिती नेण्याचे तेल कंपन्यांनी मान्य केले आहे. त्या समितीत पेट्रोलपंप चालक संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची तयारीही तेल कंपन्यांनी दर्शवली आहे. येत्या १० दिवसांत हे निर्णय मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्याचे लोध यांनी सांगितले.
याआधी केवळ आॅक्टोबर महिन्यात पेट्रोलपंप चालकांना कमिशनवाढ मिळत होती. मात्र यापुढे वर्षातून दोनवेळा म्हणजेच जानेवारी आणि जुलै महिन्यांत कमिशनवाढ देण्याचे तेल कंपन्यांनी मान्य केले आहे. तसा करारही पेट्रोलपंप चालक आणि तेल कंपन्यांमध्ये झाला आहे. अशाप्रकारे करार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा लोध यांनी केला आहे. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी मात्र १ डिसेंबरपासून होणार असल्याचे लोध यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एक शिफ्टमध्ये काम करण्याचे आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.