आसनपोई ग्रामस्थांचे मंगळवारी आंदोलन
By Admin | Updated: May 30, 2016 02:26 IST2016-05-30T02:26:21+5:302016-05-30T02:26:21+5:30
स्फोटक उत्पादनामुळे हैराण झालेल्या आसनपोई ग्रामस्थांनी ३१ मे रोजी (मंगळवार) कारखाना प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला

आसनपोई ग्रामस्थांचे मंगळवारी आंदोलन
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील आसनपोई गावालगतच असलेल्या लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्यातील प्रदूषणकारी आणि स्फोटक उत्पादनामुळे हैराण झालेल्या आसनपोई ग्रामस्थांनी ३१ मे रोजी (मंगळवार) कारखाना प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणकारी कारखाना आणि उत्पादन त्वरित बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत केली.
लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्याचे हे औद्योगिक वसाहतीतील दुसरे युनिट असून या कारखान्यात डोयकोटेन नावाचे रासायनिक उत्पादन घेतले जाते. यापूर्वी या कारखान्यात लहान-मोठे स्फोट झाले आहेत. २७ फेब्रुवारीला या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे आसनपोई गावातील घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. तसेच ध्वनी व वायूप्रदूषणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार या कारखान्याबाबत तक्रारी करूनही तसेच कारखाना बंद करण्याची मागणी करूनही प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. आरोग्य विभागाने केलेल्या आरोग्य तपासणीवर गावातील २८ जणांना क्षयरोग, कॅन्सर तसेच घशाचे आजार, त्वचेचे विकार झाले असल्याची बाब उघडकीस आली असून महिलांनाही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे आजार बळावत असल्याचे समोर आलेले आहे. स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने ग्रामस्थांनीच कारखाना बंद करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबाबत प्रांताधिकारी, पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वांना कळवूनही याबाबत कुठलीही दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी आंदोलन केल्यास ग्रामस्थांवर कारवाई करा, अशा सूचना प्रशासनाने दिल्याने यावेळी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्यावर संताप व्यक्त केला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत जाधव, लक्ष्मण गरुड, सरपंच वसंत खोपडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
खोटे सांगून उभारला कारखाना
कारखान्याच्या प्रशासनाने आपल्याला या जागेत साठवण टाक्या उभ्या करायच्या असल्याचे सांगून ग्रामपंचायतीची ना हरकत परवानगी घेतली. मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारखान्याची उभारणी करून ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला.
डोंबिवलीसारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोरपणे पावले उचलावीत, अशी मागणी या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केली.
ध्वनी व वायूप्रदूषणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार या कारखान्याबाबत तक्रारी करूनही तसेच कारखाना बंद करण्याची मागणी करूनही प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी के ला.