सांगलीत सगळ्याच पक्षांची पळापळ
By Admin | Updated: September 27, 2014 00:11 IST2014-09-26T23:59:26+5:302014-09-27T00:11:04+5:30
राजकीय उलथापालथी : सर्वच पक्षांतील उमेदवारी निश्चितीचा घोळ कायम

सांगलीत सगळ्याच पक्षांची पळापळ
सांगली : आघाडी व महायुती तुटल्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांची उमेदवार निश्चितीसाठी पळापळ सुरू होती. राष्ट्रवादीचे नेते दिवसभर कार्यालयात बसून इच्छुकांची चाचपणी करीत होते, तर काँग्रेसमध्ये मिरज, तासगावबाबत खल रंगला होता. सायंकाळी मिरजेतील उमेदवारी बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपने विद्यमान आमदार संभाजी पवार, प्रकाश शेंडगे यांचा पत्ता कट केल्याने खळबळ उडाली. संभाजी पवार व त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधत निवडणुकीसाठी शड्डू ठोकला, तर राष्ट्रवादीने प्रकाश शेंडगेंसाठी गळ टाकला. रात्री उशिरापर्यंत उमेदवारांची शोधमोहीम सुरू होती.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता उद्याचाच दिवस राहिला आहे, मात्र सर्वच राजकीय पक्षांना तुल्यबळ उमेदवारांची चणचण भासत आहे. आघाडी तुटल्याने राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. ऐनवेळी जत, पलूस-कडेगाव, सांगली, मिरज या चार मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच राष्ट्रवादीपुढे निर्माण झाला होता. त्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील दिवसभर जिल्हा कार्यालयात ठाण मांडून होते.
जतमधून भाजपने तिकीट कापलेले आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासाठी प्रयत्न सुरू होते. पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्यांना कार्यालयात बोलावून चर्चा करण्यात आली. निवडून येण्याची क्षमता, या निकषावर इच्छुकांची चाचपणी झाली. शेंडगे यांना डावल्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्याची तयारी चालविली आहे. पलूस-कडेगावमधून अरुण लाड यांनी उमेदवारी नाकारली आहे.
काँग्रेसमध्येही मिरजेतील उमेदवारीचा घोळ सायंकाळपर्यंत कायम होता. पतंगराव कदम यांनी सिद्धार्थ जाधव यांच्या नावाची घोषणा केली होती, पण त्यांना इतर इच्छुकांनी विरोध केला. उमेदवारी बदलण्यासाठी दिल्लीपर्यंत धाव घेतली. सायंकाळी सी. आर. सांगलीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. मिरजेत त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. तासगाव, इस्लामपूर, जत या तीन मतदारसंघांतील उमेदवारी निश्चित करण्यासाठी काँग्रेसमध्ये खलबते सुरू होती.
भाजपने आ. संभाजी पवार यांचा पत्ता कट करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर पवार यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. ठाकरे यांनी त्यांना हिरवा कंदील दाखविल्याने पवार यांचे पुत्र पृथ्वीराज शिवसेनेच्या चिन्हावर रिंगणात उतरणार आहेत. भाजपने सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत गटाने जल्लोष केला. जतमधून प्रकाश शेंडगे यांचे तिकीट कापून विलासराव जगताप यांना देण्यावर शिक्कामोर्तब झाले. मनसेने मिरज व इस्लामपूर येथून अनुक्रमे नितीन सोनवणे व उदय पाटील यांच्या नावांची घोषणा केली. आतापर्यंत मनसेने आठपैकी सहा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसमधील तासगाव, इस्लामपूर, जतमधील घोळ आजही कायम होता. (प्रतिनिधी)
निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या जिल्ह्यातील तुल्यबळ पक्षांत एकीकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच असताना, आयात उमेदवारांवरून निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. राष्ट्रवादीतून योगेंद्र थोरात इच्छुक आहेत. पण काँग्रेसमधून आलेल्या सिद्धार्थ जाधव व बाळासाहेब होनमोरे यांच्याभोवतीच उमेदवारीची चर्चा सुरू असल्याने थोरात समर्थक नाराज होते. हीच स्थिती भाजपमध्येही होती. संभाजी पवार यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या निष्ठावंतांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. शिवाजी डोंगरे यांनाही डावलल्याने त्यांनीही नाराजीचा सूर आळवला आहे. निष्ठावंतांना न्याय कधी मिळणार?, असा सवाल आता कार्यकर्ते करू लागले आहेत.
पलूस कडेगाव मतदारसंघातील उमेदवार निश्चितीसाठी राष्ट्रवादीला घाम गाळावा लागत होता. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांना गळ घातली होती. पण दोघांनीही नकार दिला. पलूसचे माजी जि. प. सदस्य बापूसाहेब येसुगडे यांनीही नकार दिल्याने पलूस-कडेगावच्या उमेदवारीची कोंडी कायम आहे.
सांगलीतून शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांनी राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याने या मतदारसंघातील इच्छुकांत नाराजी पसरली होती. एक इच्छुक बैठकीतून नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा राष्ट्रवादी कार्यालयात होती, तर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान हे इच्छुक कार्यालयातच तळ ठोकून होते. गृहमंत्री आर. आर. पाटील व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागली होती.
मनसेला धास्ती
दुपारपासून मुंबईत शिवसेना व मनसेच्या युतीची चर्चा सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील मनसे उमेदवारांचा रक्तदाब वाढला होता. मनसेने आतापर्यंत आठपैकी सहा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने सांगलीतून पृथ्वीराज पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, तर मनसेने अॅड. स्वाती शिंदे, इस्लामपुरातून शिवसेनेने भीमराव माने, तर मनसेने उदय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भविष्यात शिवसेना-मनसे यांचे सूर जुळले, तर मनसेच्या उमेदवारांवर गंडांतर येणार आहे.
मतदारसंघ काँग्रेसराष्ट्रवादीभाजप शिवसेना इतर
सांगली मदन पाटील दिनकर पाटील सुधीर गाडगीळपृथ्वीराज पवारअॅड. स्वाती शिंदे,
सुरेश पाटील शिवाजी डोंगरे
मिरजसी. आर. सांगलीकरबाळासाहेब होनमोरेसुरेश खाडेतानाजी सातपुतेआनंद डावरे
प्रा. सिद्धार्थ जाधव नितीन सोनवणे
तासगाव-महादेव पाटीलआर. आर. पाटीलअजितराव घोरपडेजयसिंग शेंडगेसुधाकर खाडे
क.महांकाळसुरेश शेंडगे
वाळवाजितेंद्र पाटीलजयंत पाटीलविक्रम पाटीलभीमराव मानेबी. जी. पाटील
पलूस-पतंगराव कदमसुरेखा लाडपृथ्वीराज देशमुखलालासाहेब गोंदीलसंदीप राजोबा
कडेगाव मोहनराव यादव संजय विभुते
शिराळासत्यजित देशमुखमानसिंगराव नाईकशिवाजीराव नाईकनंदकिशोर निळकंठतानाजी सावंत
जतविक्रम सावंतप्रकाश शेंडगेविलासराव जगतापबाबूराव दुधाळभाऊसाहेब कोळेकर
रमेश पाटील संगमेश तेली
सुरेश शिंदे
आटपाडीसदाशिवराव पाटीलअमरसिंह देशमुखगोपीचंद पडळकरअनिल बाबरहणमंतराव देशमुख
सुभाष पाटील