बाळाला मारून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: August 3, 2016 00:43 IST2016-08-03T00:43:17+5:302016-08-03T00:43:17+5:30
रुपीनगर येथे राहणाऱ्या महिलेने स्वत:च्या दोन वर्षाच्या मुलाला विष पाजून मारले.

बाळाला मारून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : रुपीनगर येथे राहणाऱ्या महिलेने स्वत:च्या दोन वर्षाच्या मुलाला विष पाजून मारले. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दीर अचानक घरी आल्यामुळे तिचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. बाळ मात्र दगावले. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. पोटच्या मुलीचा गळा दाबून मातेने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या कासारवाडीतील घटनेला दहा दिवसांचा अवधी उलटला नाही, तोच शहरात घडलेली ही दुसरी धक्कादायक घटना आहे.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला विष पाजून मारणाऱ्या महिलेचे नाव स्वाती माळवदकर (वय ३२) असे आहे. तर विष पाजल्याने दगावलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचे नाव निशिगंध असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगरमधील कोयनानगर कॉलनीत राहणाऱ्या स्वाती माळवदकर या महिलेने पोटच्या मुलाला विष पाजून त्याचा जीव घेतला. त्यानंतर तिने स्वत: गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
महिलेचा दीर घरी आला, त्या वेळी त्याला घरात भयानक परिस्थिती पाहावयास मिळाली. विष पाजल्याने मृत झालेले बालक घरात फरशीवर पडले होते. महिलेच्या संशयित हालचाली सुरू होत्या. हालचालींवरून ती स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या महिलेने लिहून ठेवलेली चिठ्ठीही घटनास्थळी मिळाली. नैराश्येपोटी तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृत बालकाला उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)