कर्त्या मुलावरील उपचारासाठी आईची धडपड
By Admin | Updated: May 8, 2014 12:26 IST2014-05-08T12:26:40+5:302014-05-08T12:26:40+5:30
उपचारासाठी आईची धडपड

कर्त्या मुलावरील उपचारासाठी आईची धडपड
कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील श्रीमती शांताबाई इंगवले यांच्या घरातला कर्ता मुलगा गेली पंधरा दिवस दवाखान्यात अॅडमिट आहे. घरातील होते नव्हते तेवढे पैसे शांताबाई यांनी मुलांच्या औषधोपचारासाठी खर्च केले. मुलाला बरा करायचाच, ही एक इच्छा घेऊन इकडून तिकडून पैसे उभारते आहे. पण, तिच्या या धडपडीला आता समाजातील दातृत्वाच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे. शांताबाई या गावातील रेणुका मंदिरातील पुजारी. तेथून मिळणार्या उत्पन्नावरच त्यांनी आजवर संसाराचा गाडा हाकला. पोरीचं लग्न झालं. थोरला शिकला नाही. तो सेंट्रींग कामगार आहे. धाकट्याने मात्र चांगले शिक्षण घेतले. पुढे तिघांचेही संसार सुखाने सुरू झाले. पण, दीड वर्षांपूर्वी या कुटुंबावर नियतीनेच घाला घातला. एका खासगी कंपनीत काम करणार्या धाकट्या धनाजीचा अपघात झाला. मेंदूजवळ रक्तस्राव होऊन गाठी झाल्या. त्यांच्या उपचारासाठी दीड लाखाहून अधिक रक्कम जमवली आणि दवाखान्याचा खर्च र्ही भागविला. इकडून तिकडून गोळा केलेल्या पैशांची परतफेड आता कुठे होते न होते तोच धनाजीला गेल्या पंधरा दिवसांपूर्र्वी पुन्हा त्रास सुरू झाला. मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुन्हा औषधोपचार सुरू झाले. पंधरा दिवसांत पुन्हा लाख, सव्वा लाख रुपये खर्च झाले. अजूनही किती दिवस उपचार करावे लागणार, हे सांगता येत नाही आणि दुसरीकडे पैसे उपलब्ध होण्याचे सारे पर्याय संपले आहेत. (मदतीसाठी- मोबाईल नंबर- 8421026223, बँक खाते- बँक आॅफ इंडिया, शाखा- आंबेवाडी, सेव्हिंग खाते क्रमांक- 092110110007181, आयएफएससी कोड- बीकेआयडी 0000921, एमआयसीआर कोड- 416013007)