मृत मुलाचे अवयव आईने केले दान!
By Admin | Updated: January 16, 2016 02:09 IST2016-01-16T02:09:07+5:302016-01-16T02:09:07+5:30
मुलाचे अवयव मरणोत्तर दान करून माऊलीने घालून दिला आदर्श.

मृत मुलाचे अवयव आईने केले दान!
मेहकर : ज्या मुलाला नऊ महिने पोटात ठेवलं तो या जगातून एकाएकी निघून जाणे कुठल्याही माऊलीसाठी क्लेषदायकच असते; मात्र मेहकर तालुक्यातील एक माता या धक्कातून सावरली. आपला मुलगा गेला; मात्र दूसर्याच्या पोटचा गोळा वाचला पाहिजे म्हणून मुलाचे अवयव मरणोत्तर दान करून या माऊलीने आदर्श घालून दिला आहे.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदाबाई मगर यांना राम व श्याम अशी दोन मुले. पती सुधाकर मगर यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे खचलेल्या मंदाबाईंनी मुलांचा सांभाळ केला. मुलगा राम सुधाकर मगर (२४) याने बीएससी कृषी पदवी प्राप्त केली; त्यामुळे आता आईला आरामात जीवन जगता येईल, अशी स्वप्ने राम पाहत होता. बीएससी झालेला राम मगर १२ जानेवारी रोजी अकोला येथे नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेला. मोटारसायकलवरून देऊळगाव माळी येथे आपल्या गावी परतत असताना मालेगाव तालुक्यातील चांडसनजीक त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला. रामच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रामला तत्काळ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. १४ जानेवारी रोजी रामची जीवनयात्रा अध्र्यावरच संपली; अन् रामच्या आईवर मोठे संकट कोसळले. माऊलीच्या दु:खाला पारावार राहिला नाही. त्यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रामचे अवयव दान करण्याची संकल्पना आईसमोर मांडली. आईनेही आपल्या दु:खाला आवर घालत रामचा देह जीवंत नसला तरी, त्याचे अवयव दान करून आपला मुलगा कुणाच्या तरी देहात जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला.
चार जणांना मिळणार जीवनदान
रामच्या कुटुंबाने अवयव दान करण्यास होकार दिल्यानंतर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना बोलविण्यात आले. हृदय घेण्यासाठी चेन्नई येथून, तर लिव्हर घेण्यासाठी मुंबईहून डॉक्टरांची चमू आली. एका किडनीचे प्रत्यारोपण औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये करायचे आणि दुसरी मुंबईला पाठवायचे ठरले. अवयव सुरक्षित आणि वेळेत पाठविण्यासाठी एअर अँम्बुलन्सची व्यवस्थाही करण्यात आली. रामचे हृदय, किडनी व लिव्हर दान केल्यामुळे चार जणांना जीवनदान मिळणार आहे.
देऊळगावमाळी येथे संक्रात दु:खात
आयुष्याच्या उतारवयात ज्या मुलाच्या खांद्याचा आधार घ्यायचा तो पोटचा गोळा एकाएकी निघुन गेल्याने; आईच्या अश्रुंचा बांध फुटला. २४ वर्षीय राम अध्र्यावरच सर्वांना सोडून गेल्याने मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी गाव शोकसागरात बुडाले असून, १५ जानेवारी रोजी मकरसंक्रातीच्या सणावर गावात दु:खाचे सावट होते.