तीन मुलींचा खून करून मातेची आत्महत्या

By Admin | Updated: May 27, 2016 00:28 IST2016-05-27T00:28:46+5:302016-05-27T00:28:46+5:30

मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेने तीन मुलींचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना

Mother suicides by killing three girls | तीन मुलींचा खून करून मातेची आत्महत्या

तीन मुलींचा खून करून मातेची आत्महत्या

औरंगाबाद : मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेने तीन मुलींचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
राधा संतोष त्रिभुवन (२४) हिने पोटच्या तीन मुली राजनंदिनी (७), कोमल (४) आणि प्रांजल (२) यांचा खून करून स्वत:चेही जीवन संपविले. राधा आणि संतोष यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला. राधाच्या माहेरच्या लोकांनी जावयाला एक लाख रुपये दिले होते. त्यानंतरही त्यांच्याकडून पैशांची मागणी होत होती. पहिल्या दोन मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा त्रास वाढला होता.
संतोष तिला बेदम मारहाण करायचा. त्यामुळे तिने तीन वर्षांपूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली होती. तेव्हा तिच्या नंदई आणि अन्य नातेवाईकांनी यापुढे कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी दिल्याने ती नांदावयास गेली होती. त्यानंतर तिने तिसऱ्या मुलीस जन्म दिला आणि तिच्या त्रासात अधिक भर पडल्याचे राधाच्या आईने सांगितले. गुरुवारी पहाटे राधाने गळफास घेतला. कुटुंबियांंनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. दुसरीकडे राजनंदिनी, कोमल आणि प्रांजल या तिघी झोपेतून उठल्याच नाहीत. तपासणीत त्यांचाही मृत्यू झाल्याचे आढळले. (प्रतिनिधी)

Web Title: Mother suicides by killing three girls