बहिणीवर अत्याचार करणा-या मुलाची आईनेच केली हत्या
By Admin | Updated: October 29, 2015 09:13 IST2015-10-29T01:10:08+5:302015-10-29T09:13:08+5:30
दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीवरच बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध मुलाला जन्मदात्रीने रौद्ररूप धारण करून यमसदनी धाडल्याची घटना चिखली येथे मंगळवारी रात्री घडली

बहिणीवर अत्याचार करणा-या मुलाची आईनेच केली हत्या
चिखली (बुलडाणा) : दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीवरच बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध मुलाला जन्मदात्रीने रौद्ररूप धारण करून यमसदनी धाडल्याची घटना चिखली येथे मंगळवारी रात्री घडली. मुलीची अब्रू वाचविण्यासाठी मुलावर आधी तलवारीने वार आणि मग गळा दाबून त्याला ठार मारणाऱ्या या मातेने घटनेनंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
रामानंद नगरमध्ये राहणाऱ्या शोभाबाई शेषराव जाधव यांना कृष्णा आणि ज्ञानेश्वर ही दोन मुले आणि चार मुली आहेत. कृष्णा (२१) हा रिक्षा चालविण्याचे काम करतो; मात्र त्याला दारूचे व्यसन जडल्याने घरी नेहमीच वाद होत असत. दारूच्या नशेत तो नेहमीच आई आणि दोन बहिणींशी लगट करायचा. मंगळवारी रात्री दारूच्या नशेत त्याने तलवारीचा धाक दाखवून, बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिची आरडाओरड ऐकून शोभाबार्इंनी घरात धाव घेतली; मुलाचे दुष्कृत्य पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी लोखंडी पाईपने मुलावर हल्ला चढवून, त्याच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. याच तलावारीने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर असंख्य वार केले. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन कृष्णा जमीनीवर कोसळला. त्यानंतर शोभाबार्इंनी गळा आवळून त्याचा खून केला. मुलाचा खून केल्यानंतर शोभाबार्इंनी आत्मसमर्पण करून, घटनेची संपूर्ण माहिती दिली.