मातापित्याने मारले... तिला स्नेहज्योतीने तारले...!
By Admin | Updated: October 15, 2015 00:43 IST2015-10-14T23:38:44+5:302015-10-15T00:43:32+5:30
--जागतिक अंध सहाय्यता दिन

मातापित्याने मारले... तिला स्नेहज्योतीने तारले...!
शिवाजी गोरे -- दापोली--जन्मत:च पूजा दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याची खात्री पटल्यावर जन्मदाते माता-पिताच तिचे वैरी बनले. जन्मदाते पोटच्या गोळ्याला रात्रीच तिला चिरेखाणीत टाकून निर्दयीपणे निघून गेले. परंतु ‘देव तारी त्याला त्याला कोण मारी’ असे म्हणतात. त्याप्रमाणे पूजाला देवानेच तारले. मंडणगड तालुक्यातील घराडी स्नेहज्योती अंध विद्यालयाने तिचे मातृत्व स्वीकारत, तिला हक्काचा आधार दिला. अंधसहाय्यतेचे याहून दुसरे मोठे उदाहरण काय असणार?
चार वर्षांपूर्वी लांजा येथे चिरखाणीत काम करणाऱ्या एका परप्रांतीय जोडप्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु ते बाळ दोन्ही डोळ्यानी अंध असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर अंध बाळाला रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन बेवारसपणे चिरेखाणीत उघड्यावर टाकून हे जोडपे रात्रीच निघून गेले. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनी सामाजिक संस्थेला आवाहन केले होते. या मुलीची बातमी ‘स्नेहज्योती’चे संचालक उत्तम जैन यांना कळली. त्यांनी रत्नागिरी येथे जाऊन त्या बाळाचे पालकत्व स्वीकारल्याची कायदेशीर पूर्तता पूर्ण करुन पूजाला ताब्यात घेतले. त्यावेळी तिचे वय केवळ चार महिन्यांचे होते. आता ती चार वर्षांची झाली आहे. स्नेहज्योतीच तिच्यासाठी पालक झाले आहे.