दोन चिमुकल्यांना पेटवून देत मातेचीही आत्महत्या ?
By Admin | Updated: August 12, 2016 18:41 IST2016-08-12T18:41:05+5:302016-08-12T18:41:05+5:30
आमखास मैदान परिसरातील गुलाबवाडी येथे एका घरात महिलेसह तिचे दोन्ही चिमुकले जळालेल्या अवस्थेत आढळून आले

दोन चिमुकल्यांना पेटवून देत मातेचीही आत्महत्या ?
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 - शहरातील आमखास मैदान परिसरातील गुलाबवाडी येथे एका घरात महिलेसह तिचे दोन्ही चिमुकले जळालेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. यात आई प्रमिला सचीन गायकवाड (२५) व तिचा एक महिने वयाचा मुलगा प्रफूल या दोघांचा अक्षरश: कोळसा झाला. ते जागीच मरण पावले. तर तीन वर्षीय मुलगी सोनाक्षी गंभीर भाजली आहे. प्राथमिक तपासात मातेनेच काही तरी कारणावरून आपल्या दोन्ही चिमुकल्यांना पेटवून देत स्वत:ही जाळून घेतले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिलाचा पती हा मोलमजुरी करतो. तो कामासाठी बाहेर गेलेला होता. घरी प्रतिला, मुलगा प्रफूल आणि मुलगी सोनाक्षी हे तिघेच होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या नजरेस पडले. शेजाऱ्यांनी गायकवाड यांच्या खोलीकडे धाव घेतली. दरवाजा उघडला. तेव्हा आत प्रमिला आणि चिमुकल्या प्रफूलचा जळाल्याने कोळसा झाल्याचे दिसून आले. तर सोनाक्षी गंभीर भाजलेली असून ती तेथे विव्हळत पडलेली आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले. मग अॅम्ब्यूलन्स बोलावून या तिघांना घाटीत आणण्यात आले. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.