मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अशा विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला असला तरी इतर मंत्र्यांनी अद्याप तसे केलेले नाही.
कृषी विभागात सध्या विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते. मात्र, आता नवीन शासन निर्णयानुसार कृषी संचालक या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित व मुदतपूर्व बदल्या पूर्वीप्रमाणेच मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने केल्या जाणार असून कृषी सहसंचालक व अधीक्षक कृषी अधिकारी या केवळ दोनच संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या कृषिमंत्री यांच्या मान्यतेने होणार आहेत.
त्यापेक्षा निम्न संवर्गातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी या तीन संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार आता कृषी आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत.
गट ‘क’ मधील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्वीप्रमाणे कृषी सहसंचालक यांच्यामार्फत करण्यात येतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागाने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला आहे.