सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात !
By Admin | Updated: August 20, 2015 12:33 IST2015-08-20T01:07:30+5:302015-08-20T12:33:23+5:30
पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर बलात्काराची विकृती वाढीला लागल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नातेवाइकांनीच

सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात !
जयेश शिरसाट , मुंबई
पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर बलात्काराची विकृती वाढीला लागल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नातेवाइकांनीच आया-बहिणी, मुलींवर अत्याचार केला, असे विकृत व अत्यंत धक्कादायक गुन्हे देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या संख्येने घडले आहेत.
बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे परिचितांकडून घडतात, हे तपासातून अनेकदा समोर येते. मात्र आजोबांनी नातीवर, बापाने मुलीवर, भावाने बहिणीवर तर मुलाने आईवर बलात्कार करणे हे गुन्हे पोलीसदेखील अत्यंत विकृत आणि गंभीर प्रकारातील मानतात. गेल्या वर्षी ९४ मुली-महिलांवर रक्ताच्या नातेवाइकांनी अतिप्रसंग केल्याचा एनसीआरबी रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. असे गुन्हे केरळ (६२), राजस्थान (५९), मध्य प्रदेश (५९) आणि उत्तर प्रदेश (५१) याही राज्यांमध्ये घडले आहेत. मात्र त्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी संपूर्ण देशभरात ३७,४१३ बलात्काराचे गुन्हे नोंदले गेले. महाराष्ट्रात ३ हजार ४६५ जणींवर बलात्कार करण्यात आला. या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. तर मध्य प्रदेश (५०८५), राजस्थान (३,७७०), उत्तर प्रदेशात (३,४६८) महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त गुन्हे घडले आहेत. असे असूनही या राज्यामध्ये नातेवाइकांकडून बलात्कार घडण्याचे प्रमाण कमी आहे. या तीन राज्यांच्या तुलनेत १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलींवर महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्कार घडलेत. महाराष्ट्रात ६ वर्षांपर्यंच्या ११२, ६-१२ वयोगटातील २५३ आणि १२ ते १६ वयोगटातील ७३१ मुलींवर बलात्कार झाले आहेत. ६ वर्षांपेक्षा खालील चिमुरडींवर बलात्कारात दिल्ली (७१) दुसऱ्यास्थानी आहे. मात्र मध्य प्रदेशात हे प्रमाण ४३ आहे. यूपीत ५३ आणि राजस्थानात २ इतके आहे. महाराष्ट्रात १ ते १६ वर्षे वयोगटातील १,०९६ मुलींवर बलात्कार झाले. हेच प्रमाण यूपीत ८८६, राजस्थानमध्ये ३७५ इतके आहे.