मुली हरवण्याचे प्रमाण अधिक
By Admin | Updated: November 19, 2014 05:05 IST2014-11-19T05:05:45+5:302014-11-19T05:05:45+5:30
सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्यात चालू वर्षात १४ ते १८ या वयोगटातील हरवलेल्या आणि पळवलेल्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली

मुली हरवण्याचे प्रमाण अधिक
ठाणे : सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्यात चालू वर्षात १४ ते १८ या वयोगटातील हरवलेल्या आणि पळवलेल्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यांत २३४ मुले व ४७३ मुली हरवल्या. ५१ मुलींना पळवण्यात आले आहे. दुसरीकडे ० ते ७ आणि ७ ते १४ या वयोगटात ४१
मुले हरवलेली असून, ८३ मुलींना पळवण्यात आले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा पहिल्या १० महिन्यांत एकूण ७८२ लहान मुले हरवली. त्यामध्ये ५०७ मुली व २७५ मुलांचा समावेश आहे. हरवलेल्यांपैकी ५३५ बालकांचा शोध लागला आहे. अजूनही २४७ मुले-मुली बेपत्ता आहेत. वयोगटानुसार विचार केल्यास १४ ते १८ या वयोगटातील मुले आणि मुलींचे हरवण्याचे प्रमाण हे ० ते ७ आणि ७ ते १४ या वयोगटातील मुलांपेक्षा अधिक आहे. १४ ते १८ या वयोगटात ४७३ मुली तर २३४ मुले हरवल्याची नोंद आहे. त्याप्रमाणे मुली सापडण्याचेही प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये ३२२ मुली तर १६१ मुलांचा समावेश आहे. १५१ मुली आणि ७३ मुले अद्यापही गायब आहेत. ० ते ७ आणि ७ ते १४ वर्षांखालील गटात ४१ मुले तर ३४ मुली हरवलेल्या आहेत. त्यात ० ते ७ मध्ये २४ मुले तर ७ ते १४ वयोगटात २७ मुली हरवल्या आहेत. २४ मुलांपैकी ६ मुले तर २७ मुलींपैकी ५ मुली अद्यापही
गायब झाल्याची माहिती
पोलिसांनी दिली.
दुसरीकडे २०२ मुले-मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल झाले असून १०९ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर एकूण ९३ अपहरण झालेल्या मुलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. ७ ते १४ या वयोगटातील १२२ मुला-मुलींचे अपहरण झाले असून, ६४ जण अद्यापही सापडलेले नाहीत. १४ ते १८ या वयोगटात ५९ मुला-मुलींचे अपहरण झाले आहे. त्यापैकी २१ मुला-मुलींचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
बेपत्ता होण्यामागची कारणे
घरघुती भांडणे, प्रेमप्रकरण, मानसिक संतुलन बिघडणे अशी अनेक कारणे व्यक्तींच्या बेपत्ता होण्यामागे असतात. मात्र मुले बेपत्ता होतात तेव्हा घरच्यांच्या धाकामुळे पळून जाणे, अपहरण होणे ही कारणे असल्याचे आढळून येते, अशी माहिती
पोलिसांनी दिली.
(प्रतिनिधी)