एसटीकडून ३,३१२ जादा बसेस
By Admin | Updated: July 15, 2015 23:59 IST2015-07-15T23:59:15+5:302015-07-15T23:59:15+5:30
येत्या २७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीकडून ३,३१२ जादा बसेस
मुंबई : येत्या २७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ३ हजार ३१२ जादा बसेसचे नियोजन एसटीकडून करण्यात आले असून त्याशिवाय वैद्यकीय मदत केंद्र, प्रसाधनगृह अशा सेवाही पुरवण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळातर्फे अमरावती येथून ४५२, औरंगाबाद येथून ९५८, नागपूरमधून ५६, पुणेमधून ९७५, नाशिक येथून ७५५ आणि मुंबईतून ११६ बसेस सोडल्या जाणार आहेत. पंढरपूर येथील चंद्रभागा यात्रा बस स्थानकाशिवाय देगांव फाटा येथील विठ्ठल सहकारी सूत गिरणीच्या २५ एकर जागेत नवीन ‘भीमा यात्रा स्थानक’ उभारण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. तसेच भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंढरपूर मुख्य बस स्थानक, चंद्रभागा आणि भीमा यात्रा स्थानकांवर माहिती तसेच प्रवासी मार्गदर्शक कक्ष उघडण्यात आले आहेत. स्थानक परिसरात भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र, उपहारगृहे, विश्रांती कक्ष, प्रसाधन गृह, झुणका-भाकर स्टॉल, पिण्याचे पाणी तसेच अखंड वीज पुरवण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे साहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले. या गाड्यांच्या आरक्षणासाठी आॅनलाइन आरक्षण सेवा उपलब्ध असून, एसटीच्या संकेतस्थळाद्वारे अथवा आरक्षण केंद्रांद्वारे भाविक या सेवेचा लाभ घेऊ शकतात, असेही धस म्हणाले.
यात्रा संपल्यावर पंढरपूर येथून आळंदी, देहू, तुळजापूर, शिखर शिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी या यात्रेसाठी एसटीने ३ हजार १४३ जादा बस सोडल्या होत्या. या गाड्यांच्या २२ हजार २३५ फेऱ्यांद्वारे १३ कोटी ६३ लाख रुपये उत्पन्न एसटीने मिळवले होते.