रोहा बायपासवरील मोरी बुजवली
By Admin | Updated: July 4, 2016 03:27 IST2016-07-04T03:27:08+5:302016-07-04T03:27:08+5:30
रोहा बायपास रोडवरील मोरीसमोर मातीचा भराव टाकून मोरी बुजविल्याने पाण्याचा निचरा होत नाही.

रोहा बायपासवरील मोरी बुजवली
रोहा : रोहा बायपास रोडवरील मोरीसमोर मातीचा भराव टाकून मोरी बुजविल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे लोकवस्तीला लागून असलेल्या सखल भागात दुर्गंधीयुक्त पाण्याचे तलाव तयार झाले आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे भविष्यात रोगराई पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
रोहे शहरातील धाटाव एमआयडीसी अंतर्गत दमखाडी ते पीर गाझी शेख सलाऊद्दीन दर्गा मैदान पर्यंत बायपास रोड बांधण्यात आला आहे. या रस्त्याकरिता आजतागायत शासनाने कोट्यवधी रूपये खर्ची घातले आहेत. ठिकठिकाणी मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यातच दर्गा रोडजवळील एका नाल्यासमोर मातीचा भराव करून मोरीचे तोंड बंद केले आहे. पर्यायाने दक्षिणेकडील जवळपास चार ते पाच एकर मोकळ्या जागेत पावसाचे पाणी व अन्य घरातील सांडपाणी तुंबले आहे. या सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी जमले असून शेजारी एसबीआय बँकेसमोरील टेम्पो स्टॅण्डलगत बाजारपेठेतील व्यापारी घनकचरा टाकत असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. सर्वत्र पाणी हिरवागार झाले आहे. तसेच विचित्र घाण वास येत असल्याने या घाण पाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन शहरात रोगराई होण्याची भिती निर्माण झाली आहे.
डबीर कॉम्प्लेक्स व अन्य नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेकडे अनेकवेळा याविषयी चर्चा केली. परंतु उपाययोजना शून्य असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. शहरातील लोकवस्तीत घाणीच्या पाण्याचा तलाव निर्माण होत असताना नगरपरिषद कानाडोळा करीत आहेत. यात गौडबंगाल असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शहरातील लोकवस्तीत घाणीच्या पाण्याचा तलाव निर्माण होत असताना नगरपरिषद कानाडोळा करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिल्डर्स आणि ठेकेदारांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या नगर परिषद प्रशासनाने पावसाळ्यात एकदातरी याठिकाणी हजेरी देत आपले कर्तव्य बजावावे अशी अपेक्षा येथील रहिवाशांची असून याकडे लक्ष देण्याची मागणी करीत आहेत.
डबीर कॉम्प्लेक्स व अन्य नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेकडे अनेकवेळा याविषयी चर्चा केली. परंतु उपाययोजना शून्य असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. याकडे पावसाळ्यात लक्ष न दिल्यास या घाण पाण्यामुळे एखादा रोग पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.