राजू ओढे ठाणे : सनदी अधिका-याकडून खंडणी उकळणाºया सतीश मांगलेची शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण एवढीच असली तरी त्याची मालमत्ता तपास अधिका-यांच्या भुवया उंचावणारी आहे. कोट्यवधीची मालमत्ता त्याच्याकडे असल्याचे तपासात समोर आले आहे.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी अभिनेत्री श्रद्धा यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली होती. सतीश हा दहावी उत्तीर्ण असून, संगणक विज्ञान पदविकेचा अभ्यासक्रम त्याने अर्धवट सोडला होता. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील महागाव येथील असून, गावी त्याचा मोठा बंगला आहे. जवळपास ५0 लाख रुपयांचा खर्च त्याने या बंगल्यावर केला आहे. ठाण्यातील मीरारोडवरील लोढा प्रकल्पामध्ये त्याची आलिशान सदनिका असून, याव्यतिरिक्त आणखी एक रो-हाउसदेखील आहे. त्याच्याकडे मर्सिडिज, बीएमडब्ल्यू यासारख्या महागड्या गाड्यांव्यतिरिक्त एक आय-१0 कारही आहे. मर्सिडिजचा हफ्ता ६५ हजार रुपये महिना आहे. याशिवाय एक फॉर्च्युनर त्याने वडिलांच्या नावे घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.१५ वर्षांपूर्वी सतीश मांगले सायन येथील एका खासगी डिटेक्टिव्ह कंपनीत नोकरीला होता. त्यानंतर ही नोकरी सोडून त्याने अंधेरी येथील दुसºया एका डिटेक्टिव्ह कंपनीत नोकरी सुरू केली. २00७ साली त्याने शेर्ली नावाची स्वत:ची डिटेक्टिव्ह सेवा सुरू केली. खंडणीविरोधी पथकाकडून सतीश मांगलेची कुंडली काढण्याचे काम सुरू असून, त्याची एकूणच जीवनशैली अतिशय आलिशान असल्याचे तपासात समोर आले आहे. मोपलवार खंडणी प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एकाचा सहभाग समोर आला असून, लवकरच त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.सतीश मांगले याने खंडणीसाठी राधेश्याम मोपलवार यांच्याशी दोनवेळा प्रत्यक्ष चर्चा केली. भिवंडी येथील हॉटेल शांग्रिला आणि मुंबई येथील जे.डब्ल्यू. मेरियट हॉटेलमध्ये ते भेटले होते. या दोन्ही हॉटेल्सचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी मिळवले आहे. दोन्ही फूटेजमध्ये राधेश्याम मोपलवार आणि त्याची बैठक झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.दोन चित्रपट कंपन्यासतीशची दुसरी पत्नी श्रद्धा हीदेखील मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सतीशचा मराठी चित्रपट सृष्टीत बºयापैकी वावर आहे. पाचगणी आणि कोल्हापूर येथे दोन वर्षांपूर्वी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी चमुंपैकी मराठी अभिनेत्यांची चमू मांगलेची होती. याशिवाय मांगलेच्या दोन चित्रपट निर्मात्या कंपन्या आहेत. एका कंपनीचे नाव ओम साईश तर दुसरीचे नाव मॅड हाउस आहे. याच कंपन्यांच्या माध्यमातून श्रद्धाला चित्रपट सृष्टीत धूमधडाक्यात ‘लाँच’ करण्याची त्याची तयारी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोपलवार प्रकरण : दहावी पास मांगले मर्सिडिज, बीएमडब्ल्यूचा मालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:44 IST