चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ !
By Admin | Updated: November 13, 2016 19:25 IST2016-11-13T19:25:45+5:302016-11-13T19:25:45+5:30
पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो.

चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ !
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 13 - पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो. आपल्या कक्षेतून भ्रमण करताना चंद्र व पृथ्वी यातील अंतर कमी-अधिक होत असल्याने चंद्रप्रकाशातही बदल होत असतो. सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यामधील अंतर सर्वात कमी राहणार असून, चंद्रबिंब मोठ्या आकाराचे दिसणार आहे. या खगोलिय चमत्काराचा आनंद अवकाश निरीक्षकांनी लुटावा, असे आवाहन निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
एकंदर ८८ तारकासमुहांच्या आकाशात विविध मनोहारी घटना अधूनमधून घडत असतात. या घटना पाहण्याची इच्छा खगोल प्रेमींना असते. याआधी चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येण्याची घटना १९४८ मध्ये घडली होती. यापुढे ही स्थिती २०३४ मध्ये पहावयास मिळणार आहे. आपला चंद्र प्रत्येक राशीत २ पूर्णांक एक चतुर्थांश दिवस मुक्कामी राहून एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण १२ राशींचे चक्र पूर्ण करतो. यामुळे आकाशातील प्रत्यक्ष दिसणाऱ्या राशींची माहिती व त्यांच्या दर्शनाचा आनंद देण्यास चंद्र मदतच करतो. याच राशी चक्रातून सर्व ग्रह फिरत असल्याने दरमहा चंद्र प्रत्येक ग्रहाजवळ येतो. यालाच आपण चंद्राची त्या ग्रहसोबत युती झाल्याचे संबोधतो. चांद्र मासातील प्रत्येक पौर्णिमेला चंद्र हा त्या-त्या नक्षत्रात बघता येऊ शकतो. तसाच तो या कार्तिक पौर्णिमेला आकाशातील कृतिका या नक्षत्राजवळ पाहता येईल. (प्रतिनिधी)
सुपरमूनचा घ्या अनुभव
या घटनेलाच सुपरमूनसुद्धा म्हटल्या जाते. या स्थितीत पृथ्वी व चंद्र यामधील अंतर केवळ ३ लाख ५० हजार किलोमिटर एवढे कमी असते. त्यामुळे चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. या खगोलीय घटनेचा अनुभव घेणे निश्चितच अवर्णनिय राहणार आहे.
- ही खगोलीय घटना ६८ वर्षांनंतर होत आहे. कार्तिक पौर्णिमेला चंद्र व पृथ्वी यामधील अंतर कमी होऊन, चंद्र बिंब मोठे दिसणार आहे. दुर्मिळ असलेली ही स्थिती प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. - प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, अकोला