मुुंबई : बळीराजाचा अंत पाहू नका. आत्मक्लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी आहे. कर्जमुक्तीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करण्यास तयार रहावे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.स्वाभिमानी संघटनेची ‘आत्मक्लेश यात्रा’ पोलिसांनी भायखळा येथे रोखली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. मुंबई ते पुणे दरम्यान सलग नऊ दिवस सुरू असलेल्या या आत्मक्लेश यात्रेचा सभेने समारोप झाला. यावेळी दहा हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर कर्ज दुप्पट झाले आहे. मोदी सरकारच्या काळात तुरीचा दर प्रति क्विंटल अकरा हजार तर सोयाबीन सहा हजार वरून अडीच रुपयावर आला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करतो. मात्र, भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले नव्हते असे सरकार म्हणत असल्याने या सरकारचा खोटारडेपणा समोर आला आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊ खोत यांना लगावला टोलासीता संकटात असताना हनुमान मदतीला धावून येत नसेल, तर तो हनुमान काय कामाचा, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खोचक टोला लगावला आहे. मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे, तिथे मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय, असे विधान खोत यांनी केले होते. राज्यपालांची घेतली भेटया यात्रेच्या समारोपानंतर राजू शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या सांगत त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारा, ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये तातडीने द्या, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्तता करा, शेतीपंपाला २४ तास वीज पुरवठा करावा, संपूर्ण तूर खरेदी करा आणि तूर खरेदी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सरकारला महिन्याची मुदत
By admin | Updated: May 31, 2017 04:27 IST