राक्षसी संतोष माने जिवंत राहणे धोक्याचे!
By Admin | Updated: September 10, 2014 03:10 IST2014-09-10T03:10:06+5:302014-09-10T03:10:06+5:30
अशा गुन्हेगाराला जिवंत ठेवणे समाजासाठी घातक ठरेल, हे जेव्हा नि:संशयपणे दिसत असते तेव्हा फाशीखेरीज अन्य कोणतीही शिक्षा न्यायाची ठरत नाही.

राक्षसी संतोष माने जिवंत राहणे धोक्याचे!
मुंबई : सुमारे अडीच वर्षांपूर्वी स्वारगेट डेपोमधून पळविलेली बस पुणे शहराच्या रस्त्यांवर बेछूटपणे चालवून नऊ निरपराध व्यक्तींना चिरडून ठार करणारा व इतर ३७ जणांना गंभीर जखमी करणारा एस.टी. महामंडळाचा बडतर्फ बसचालक संतोष मारुती माने जिवंत राहणे समाजासाठी घातक आहे, असे ठामपणे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने मानेच्या फाशीच्या शिक्षेवर मंगळवारी शिक्कामोर्तब केले.
गेल्या ११ डिसेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीविरुद्ध माने याने केलेले अपील फेटाळताना न्या. विद्यासागर कानडे व न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने म्हटले की, माने याने केलेला गुन्हा संपूर्ण समाजमन सुन्न व्हावे एवढा निर्दयी, राक्षसी आणि संतापजनक आहे. अशा गुन्हेगाराला जिवंत ठेवणे समाजासाठी घातक ठरेल, हे जेव्हा नि:संशयपणे दिसत असते तेव्हा फाशीखेरीज अन्य कोणतीही शिक्षा न्यायाची ठरत नाही.
हे कृत्य आपल्या हातून वेडाच्या भरात घडले हा माने याने घेतलेला बचाव धादांत खोटा व पश्चातबुद्धीने सुचलेली लंगडी सबब आहे, असे नमूद करीत न्यायालयाने म्हटले की, याउलट एखाद्या पिसाटाला शोभावे असे हे महाभयंकर कृत्य माने याने, परिणामांची जराही तमा न बाळगता, पूर्णपणे शांत डोक्याने केल्याचे पुराव्यांवरून सिद्ध होते. अशी व्यक्ती दया दाखवायला अजिबात पात्र नाही.
तरीही या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी खंडपीठाने माने यास मरेपर्यंत फासावर लटकविण्यास आठ आठवड्यांची स्थगिती दिली.
स्वारगेट डेपोचे त्या वेळचे सहायक वाहतूक नियंत्रक शशिकांत दमकळे यांनी ड्युटी बदलून देण्यास नकार दिला, याचा राग धरून माने याने हा सूड उगविला होता. त्याचा संदर्भ देत खंडपीठ म्हणते की, अशा नराधमास दया दाखविली तर कोणालाही कायदा हाती घेऊन अपमानाचा बदला घेण्याची आणि त्यातून सहीसलामत सुटण्याची मुभा आहे, असा चुकीचा संदेश जाईल. (विशेष प्रतिनिधी)