मुंबईत मान्सूनचा संडे मूड!

By Admin | Updated: June 27, 2016 05:18 IST2016-06-27T05:18:09+5:302016-06-27T05:18:09+5:30

गेल्या ४८ तासांपासून मुंबई आणि उपनगराला चिंब करणाऱ्या पावसाने रविवारीही आपला मुक्काम कायम ठेवला.

Monsoon Sunday mood in Mumbai! | मुंबईत मान्सूनचा संडे मूड!

मुंबईत मान्सूनचा संडे मूड!


मुंबई : गेल्या ४८ तासांपासून मुंबई आणि उपनगराला चिंब करणाऱ्या पावसाने रविवारीही आपला मुक्काम कायम ठेवला. सकाळपासून कधी मुसळधार तर कधी रिमझिम असा ठेका धरणाऱ्या पावसाने सायंकाळपर्यंत मारा कायम ठेवल्याने मान्सूनचे टपोरे थेंब अंगावर झेलत मुंबईकरांनी रविवारची सुट्टी सत्कारणी लावली. सरींचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राईव्हसह वरळी सी-फेस आणि जुहू समुद्र किनारी मुंबईकरांनी गर्दी केल्याने मान्सून मूडला उधाण आल्याचे चित्र होते.
मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी, शनिवारी पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या वेगवान माऱ्यामुळे मागील दोन दिवसांपासून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला थोडाफार ब्रेक लागला असला तरी रविवारच्या सुट्टीदिवशी मुंबईकर पावसात मनसोक्त भिजत मान्सूनचा आनंद लुटण्यासाठी सकाळपासूनच समुद्र किनारी दाखल झाले. या ठिकाणी दुर्घटना घडू नये म्हणून जीवरक्षकांसह पुरेसे पोलीसही तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी ठिकठिकाणच्या मैदानात भर पावसात फुटबॉलसह क्रिकेटचे डावही रंगले होते. बच्चे कंपनीनेही पाण्यात कागदी होड्या सोडत पावसाचा आनंद लुटला.
शहर व उपनगरात ठिकठिकाणी पडझडीच्या १५ घटना घडल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही. महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात २, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १७ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर शहरात ४, पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडल्याच्या घटना घडल्या. (प्रतिनिधी)
>७८ झाडे पडली; दरडही कोसळली
भोईवाडा येथे दरड कोसळली असून सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही. शहरात १, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर मुंबई शहरात १२, पूर्व उपनगरात २३ आणि पश्चिम उपनगरात ४३ अशी एकूण ७८ झाडे पडल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
>बाळापुरात ढगफुटी
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर व परिसरात शनिवारी मध्यरात्री दोन तासांत रेकॉर्डब्रेक १२७ मि.मी. पाऊस झाला. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दीड तास बंद होती. पुरामुळे बाळापूर हद्दीतील ५० हेक्टर व शेवाळा शिवारातील १२५ हेक्टर शेती वाहून गेली.
>परभणीला झोडपले
लातूर जिल्ह्यात आणि राणीसावरगाव परिसरात झालेल्या पावसामुळे पालम तालुक्यातील लेंडी आणि गळाटी या दोन नद्यांना पूर आल्याने सहा गावांचा संपर्क तीन तासांसाठी तुटला होता़ पालम ते जांभूळबेट या रस्त्यावर पालम शहरानजिक लेंडी ही नदी आहे़ परभणी शहरासह परिसरात शनिवारी रात्री ४३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे़ तर, नांदेड शहर, जिल्ह्यात सरासरी २२.९६ मि.मी. पाऊस झाला. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे.
>अंदाज काय सांगतो?
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे १, कोल्हापूर ०़९, महाबळेश्वर १५, सांगली २, मुंबई २६, अलिबाग १८, रत्नागिरी ७३, डहाणु ३१, अमरावती १०, ब्रम्हपुरी ४, नागपूर ८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ २७, २८ व २९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

Web Title: Monsoon Sunday mood in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.