मान्सूनला एल- निनोचा धोका
By Admin | Updated: May 14, 2015 01:52 IST2015-05-14T01:52:53+5:302015-05-14T01:52:53+5:30
भारतीय उपखंडातील मान्सूनवर यंदा ‘एल निनो’चा परिणाम जाणवणार असल्याचे भाकित आॅस्ट्रेलिया आणि जपानच्या हवामान विभागांनी केले आहे.

मान्सूनला एल- निनोचा धोका
पुणे : भारतीय उपखंडातील मान्सूनवर यंदा ‘एल निनो’चा परिणाम जाणवणार असल्याचे भाकित आॅस्ट्रेलिया आणि जपानच्या हवामान विभागांनी केले आहे. परिणामी जून, जुलैमध्ये पाऊसमान कमी झाले तरी आॅगस्ट, सप्टेंबर किमान तूट भरून निघते, असे गेल्या १०० वर्षांत केलेल्या एल निनोच्या अभ्यासावरून दिसून आले आहे, असे भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी आणि डॉ़ डी़ आऱ कोठावळे यांनी संशोधनात्मक प्रबंधातून दाखवून दिले आहे.
आॅस्ट्रेलिया आणि जपानच्या हवामान विभागांनी एकूणच एल-निनोचा परिणाम जाणवेल, असा अंदाज वर्तविला आहे. जपान हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, एल-निनोचा अभ्यास करणाऱ्या मॉडेलनुसार मध्यम ते तीव्र स्वरुपाचा परिणाम जाणवणार असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियामध्ये या एल-निनो इफेक्टमुळे दुष्काळाची भीती आहे, तर भारतीय उपखंडातील मान्सूनवर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनोचा मान्सूनवर परिणाम होऊन सरासरीच्या ९१ टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे़
एल निनोच्या परिणामासंदर्भात सादर केलेल्या प्रबंधाविषयी डॉ़ कुलकर्णी म्हणाले, गेल्या १०० वर्षांत पडलेल्या पावसाचा अभ्यास करताना त्यातील २० वर्षे एल निनोचा परिणाम मान्सूनवर झाल्याचे दिसून आले़ पॅसिफिक, हिंदी महासागर आणि अॅटलॅटिक महासागरातील तापमान हे दोन घटकही महत्वाचे ठरतात़ येथील वातावरण मान्सूनला अनुकूल असेल तर एल-निनोचा जास्त परिणाम मान्सूनवर होत नाही़ गेल्या वर्षी हे दोन्ही घटक प्रतिकूल होते़ त्यामुळे देशभरात सरासरीच्या १३ टक्के कमी पाऊस झाला़ गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरीच्या ३३ टक्के कमी पाऊस झाला होता़ जुलैमध्ये हे प्रमाण आणखी वाढले़ ही तूट पावसाने आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात भरून काढली़, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.