मुंबईला मान्सूनपूर्व सरींचा इशारा
By Admin | Updated: June 1, 2017 04:15 IST2017-06-01T04:15:29+5:302017-06-01T04:15:29+5:30
मंगळवारी केरळात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होत असतानाच हवामानातील बदलामुळे येत्या ४८ तासांसाठी

मुंबईला मान्सूनपूर्व सरींचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंगळवारी केरळात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होत असतानाच हवामानातील बदलामुळे येत्या ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. शिवाय हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडेल, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २८ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच दुसरीकडे वाढत्या उकाड्यानेही मुंबईकरांना घाम फुटत आहे.
मान्सून केरळात दाखल झाला असतानाच निर्माण झालेल्या ‘मोरा’ या चक्रीवादळाची तीव्रताही कमी झाली असून, त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरावर ढग दाटून येत आहेत. शिवाय हवामानात बदल होत असून, आर्द्रतेमधील चढ-उतारासह हवेतील बाष्प कमी होत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. परिणामी, वाढता उकाडा मुंबईकरांना घाम फोडत असून, मान्सून मुंबईत दाखल होईपर्यंत येथील वातावरण कायम राहील.