मजगाव येथे बाळंत महिलेचा विनयभंग !
By Admin | Updated: February 6, 2016 02:24 IST2016-02-06T02:24:39+5:302016-02-06T02:24:39+5:30
तालुक्यातील मजगाव येथील एका बाळंतिणीचा शेजारील युवकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मुरुड पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

मजगाव येथे बाळंत महिलेचा विनयभंग !
जंजिरा : तालुक्यातील मजगाव येथील एका बाळंतिणीचा शेजारील युवकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मुरुड पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मजगाव गावामध्ये विवाहित महिला राहते. तिचा पती गवंडी म्हणून काम करतो. सहा महिन्यांपूर्वी ती महिला बाळंत झालेली असून, तिला सहा महिन्यांचा लहान मुलगा आहे. या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या महिलबरोबर भांडी धुतलेले पाणी टाकण्यावरून वाद झाला. दुपारी नवरा कामावरून आल्यावर त्याने संबंधित महिला शांताबाई यांना समजावून वाद मिटवला होता.
मात्र संध्याकाळी शांताबाईचा मुलगा विलास हा त्या महिलेच्या घरात घुसून तिच्या सासरच्या मंडळींसमोर शिवीगाळ करू लागला, तसेच बाळंतीण महिलेचा विनयभंग करीत मारहाण केली. विलास या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला.
याबाबत महिला दक्षता समिती सदस्य नगरसेविका मुग्धा जोशी यांच्यासमोर पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब घेऊन आरोपी विलासवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास विष्णू बेणारे करीत आहेत.
(वार्ताहर)