रुग्ण महिलेचा विनयभंग: डॉक्टरला अटक
By Admin | Updated: August 24, 2016 20:48 IST2016-08-24T20:48:57+5:302016-08-24T20:48:57+5:30
तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलाचा विनयभंग करणा-या डॉक्टर अमेर पंजवानी (44) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे

रुग्ण महिलेचा विनयभंग: डॉक्टरला अटक
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 24 - तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलाचा विनयभंग करणा-या डॉक्टर अमेर पंजवानी (44) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आतच पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन याप्रकरणी 20 पानांचे आरोपत्रही दाखल केले आहे. अशा प्रकारे जलदगतीने आरोपत्र दाखल होण्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती सूत्रंनी दिली.
कल्याण येथे राहणारी ही 30 वर्षीय महिला मुंबईच्या एका नामांकित कंपनीत एव्हेंट व्यवस्थापनाचे काम करते. ती गेल्या दोन वर्षापासून पाठीच्या आजाराने ग्रस्त आहे. तिच्या एका मित्रने दिलेल्या माहितीनुसार ती ठाण्याच्या नौपाडय़ातील डॉ. पंजवानी यांच्या स्पेक्ट्रम क्लिनिक मध्ये मंगळवारी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास तपासणीला गेली होती. त्यावेळी या डॉक्टरने तिच्याशी गैरवर्तन केले.
सुरुवातीला तिने प्रतिकार केल्यानंतरही त्याने हा प्रकार दोन ते तीन वेळा केल्याने तिने आरडाओरडा केला. याप्रकरणी तिने नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध रात्री 11 वा. च्या सुमारास गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पी. डी. लोंढे यांच्या पथकाने त्याला अवघ्या तासाभरातच अटक केली. घटनास्थळाचा पंचनामा, मुलीची आई आणि मित्र यांचे जबाब नोंदविल्यानंतर याप्रकरणी आरोपपत्रही बुधवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास ठाण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राई यांच्या न्यायालयात त्यांनी दाखल केले. त्याची न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश
महिलांवरील अत्याच्याराच्या गुन्ह्यांच्या संदर्भात पंचनामे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावा तसेच कलम 164 नुसार न्यायालयात साक्षीदार आणि फिर्यादी यांचे जबाब झाल्यानंतर तातडीने आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक प्रविण दिक्षित यांनी दिले होते. त्याच आदेशानुसार नौपाडयात यापूर्वी उपनिरीक्षक भिमराव सुलताने यांनीही एका विनयभंग प्रकरणाचे आरोपपत्र अवघ्या 24 तासांतच दाखल केले होते. त्यानंतर आता हे दुसरे आरोपपत्र दाखल झाले आहे.