विनयभंगातील आरोपीची आत्महत्या
By Admin | Updated: June 30, 2015 02:53 IST2015-06-30T02:53:57+5:302015-06-30T02:53:57+5:30
विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वसंतनगर तांड्यावरील बाळू बाबू राठोड (२५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली.

विनयभंगातील आरोपीची आत्महत्या
परळी (जि. बीड) : विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वसंतनगर तांड्यावरील बाळू बाबू राठोड (२५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
२४ जून रोजी रूपानगर तांड्यावरील गायरानामध्ये शेळ्या चारण्यास गेलेल्या १३वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद बाळू राठोड याच्याविरुद्ध ग्रामीण ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हा नोंद झाल्याचे कळाल्यावर बाळू हादरून गेला होता. मनस्ताप झाल्याने त्याच रात्री त्याने विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते; परंतु रविवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बाळूची पत्नी ज्योती हिच्या फिर्यादीवरून शिवाजी जाधव, दत्ता जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष राठोड, पारूबाई जाधव, अनिता साळुंके, रामभाऊ साळुंके यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. जीवे मारण्याची धमकी दिल्यानेच पतीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मृतदेह ठाण्यासमोर!
राठोड कुटुंबीयांनी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या मांडला बाळूला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला, असा दावा केला. दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ठाण्यासमोर आणला. गुन्हा नोंद केल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा राठोड कुटुंबीयांनी घेतला. गुन्हा नोंदविल्यावरच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी उचलण्यात आला.