पैसे भरूनही सदनिका न देणाऱ्या ठाण्याच्या बिल्डरविरुद्ध मोफांतर्गत गुन्हा
By Admin | Updated: July 3, 2017 20:21 IST2017-07-03T20:21:19+5:302017-07-03T20:21:19+5:30
19 लाख 70 हजारांची रक्कम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या बिल्डरविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मोफांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पैसे भरूनही सदनिका न देणाऱ्या ठाण्याच्या बिल्डरविरुद्ध मोफांतर्गत गुन्हा
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 3 - मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवारनगरात सदनिका देण्याच्या बदल्यात 19 लाख 70 हजारांची रक्कम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या बिल्डरविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मोफांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिल्डर पटेल आणि कळवा येथील मनीषानगरातील रहिवासी विनय कोचरेकर यांच्यात 11 ते 27 नोव्हेंबर 2009 या कालावधीत एक करार झाला होता. या करारानुसार कन्नमवारनगर येथील नव्या सदनिकेच्या किमतीतील 60 टक्के म्हणजे 19 लाख 70 हजारांची रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार अॅग्रीमेंटही करण्यात आले. या करारानुसार कोचरेकर यांनी काही रोकड आणि धनादेशाच्या स्वरूपात ही रककमही त्यांना दिली. परंतु, पटेल यांनी त्यांना गेल्या आठ वर्षांत कन्नमवारनगरात सदनिका दिली नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाहीत.
वारंवार विचारणा करूनही त्यांनी पैसे परत न केल्याने कोचरेकर यांनी पटेल यांच्याविरुद्ध 1 जुलै रोजी तक्रार दाखल केली. याप्रकरणी फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप रेग्युलेशन आॅफ दी प्रमोशन आॅफ कन्स्ट्रक्शन सेल (मोफा) या कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सर्व बाजूंची पडताळणी करण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय गंगावणे यांनी सांगितले.