मोदींचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा
By Admin | Updated: November 24, 2014 03:03 IST2014-11-24T03:03:59+5:302014-11-24T03:03:59+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून भाजपाने ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता.

मोदींचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून भाजपाने ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच यासंदर्भात ठराव मान्य केला असून, वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीला भाजपाचा पाठिंबा आहे. योग्य वेळी विदर्भ राज्याची निर्मिती होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नागपुरात ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट) आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या चर्चासत्रादरम्यान नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली.
मोदी यांनी मुंबईसंदर्भात वक्तव्य करताना राज्य तुटू देणार नाही, असे म्हटले होते. वेगळ््या विदर्भाला पंतप्रधानांचा विरोध असल्याचा अपप्रचार होत आहे. मुळात त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता, असा खुलासा करतानाच वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीसाठी काँग्रेसनेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आजपर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही, त्यासाठी येथील नेतेच ७५ टक्के जबाबदार आहेत. नवीन राज्य निर्माण झाल्यावर विकास होईलच, यात पूर्ण तथ्य नाही. त्यासाठी योग्य नेतृत्व, नेतृत्वाला विकासदृष्टी आणि निर्णयक्षमता आवश्यक असते. भाजपाने वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीचा ठराव अगोदरच मंजूर केला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत व त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे ते म्हणाले. देशात ‘वन मॅन शो’ सुरू नसून लोकशाही पद्धतीनेच निर्णय घेतले जातात, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र वेगळ््या विदर्भाची निर्मिती करणे योग्य नसल्याचे मत मांडले. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीमुळे विकास होईलच, असे नाही.
विदर्भातील जनतेचा यामुळे फारसा फायदा होणार नाही, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या चर्चासत्राचे संचालन केले. यावेळी त्यांच्या ‘२०१४ : इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे नितीन गडकरी व पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.