स्वतंत्र विदर्भावर मोदी यांचे मौन
By Admin | Updated: October 7, 2014 18:56 IST2014-10-07T18:54:28+5:302014-10-07T18:56:20+5:30
भाजपा महाराष्ट्राचे तुकडे पाडणार असून विदर्भाला वेगळे करणार असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाकडे नरेंद्र मोदी यांनी पूर्णत: दुर्लक्ष करीत स्वतंत्र विदर्भावर मौन पाळणे पंसत केले.
स्वतंत्र विदर्भावर मोदी यांचे मौन
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ - भाजपा महाराष्ट्राचे तुकडे पाडणार असून विदर्भाला वेगळे करणार असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाकडे नरेंद्र मोदी यांनी पूर्णत: दुर्लक्ष करीत स्वतंत्र विदर्भावर मौन पाळणे पंसत केले. नागपूरमधील कस्तूरचंद पार्कमध्ये मोदी यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी मोदी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व हंसराज अहिर यांच्या कामाची स्तूती केली.
महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भाजपाला एकहाती सत्ता द्या असे आवाहन करीत मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत भाजपाची ताकद वाढल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरले असून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. स्वतंत्र विदर्भावर मोदी काय बोलतात याकडे महाराष्ट्रातील अनेकांचे लक्ष लागले होते परंतू मोदी यांनी जाणीवपूर्वक स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख न करता मुंबई व महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भाजपाच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन केले.