अखंड महाराष्ट्राची भूमिका : भाजपा नेत्यांची गोचीमुंबई/नागपूर: स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा करणाऱ्या भाजपा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उघडे पाडले.आपल्यावरील महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे कारस्थान रचल्याचे आरोप झटकण्याकरिता मोदींनी आपण दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही, अशी घोषणा केली. यामुळे भाजपातील स्वतंत्र विदर्भवादी नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढणे व स्वतंत्र विदर्भ या दोन मुद्यावरून शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे मोदी अक्षरश: घायाळ झाले. लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसवर हल्ले करताना दिसलेले मोदी महाराष्ट्रात ‘खुलासा मोड’मध्ये गेलेले दिसले. दोंडाईचा (जि.धुळे) येथील सभेत मोदी म्हणाले की, मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. वेगळा विदर्भ व मुंबईवरून आपल्यावर आरोप केले जातात. परंतु मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून, मुंबईशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशिवाय देश अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे कुणी तुकडे करू शकत नाही. काही लोक खोटारडा प्रचार करीत आहेत.मोदींनी स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेपासून घूमजाव केल्याने विदर्भातील व विशेष करून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गोची झाली आहे. आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर कायम असून छोट्या राज्यांबाबत आमची भूमिका कायम आहे.मोदी केवळ मुंबईबाबत बोलत होते, अशी सारवासारव भाजपाने केली. परंतु महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, हे मोदी यांचे विधान मुंबई व विदर्भाला लागू होते. विदर्भाच्या अस्मितेच्या मुद्यावर विदर्भात काँग्रेसला धक्का देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आता मोदींच्या वक्तव्यामुळे विदर्भात मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.नागपुरात मोदींचे मौनउपराजधानीतील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळ्या विदर्भाबाबत काय वक्तव्य करतात, याकडे विदर्भवाद्यांसोबतच विरोधकांचेदेखील लक्ष लागले होते.मात्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ब्र शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भवाद्यांची निराशा झाली.
विदर्भाबाबत मोदींचे घूमजाव!
By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST