मोदींच्या ‘हवाहवाई’ शैलीचा फुगा फुटतोय
By Admin | Updated: October 10, 2014 00:59 IST2014-10-10T00:59:55+5:302014-10-10T00:59:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्तमान शैली जास्त दिवस प्रभाव टाकू शकणार नाही. नागरिकांना ही ‘हवाहवाई’ शैली समजली आहे व तिचा फुगा फुटतो आहे. देश व महाराष्ट्राला काँग्रेसच योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकते.

मोदींच्या ‘हवाहवाई’ शैलीचा फुगा फुटतोय
अशोक गेहलोत, बाला बच्चन यांचे प्रतिपादन : राज्यात काँग्रेसचेच सरकार येणार
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्तमान शैली जास्त दिवस प्रभाव टाकू शकणार नाही. नागरिकांना ही ‘हवाहवाई’ शैली समजली आहे व तिचा फुगा फुटतो आहे. देश व महाराष्ट्राला काँग्रेसच योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकते. राज्यात काँग्रेसच परत सत्ता स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाला बच्चन यांनी व्यक्त केला. हे दोघेही नेते नागपूर दौऱ्यावर आले असताना ‘लोकमत’ प्रतिनिधीशी चर्चा करताना त्यांनी आपले विचार बोलून दाखविले.
मोठमोठ्या गोष्टी करून मोदी यांनी स्वत:बद्दल वातावरणनिर्मिती केली होती. परंतु आता मोदी यांच्या शैलीचा फुगा फुटतो आहे. त्यांच्याबद्दल जनतेचे समर्थन कायम राहावे, असे एकही काम मोदी यांनी आतापर्यंत केलेले नाही. त्यामुळे जनतेला कळून चुकले आहे की, मोदी यांच्या शैलीमुळे देशाचा विकास होणार नाही. त्यांच्या शैलीवरून भारतीय जनता पक्षातच अंतर्गत कलहाची स्थिती आहे. वरिष्ठ नेत्यांचा तेथे अपमान होत आहे. हे सर्व जास्त दिवस चालणार नाही, असे प्रतिपादन गहलोत व बच्चन यांनी केले.
लोकसभा निवडणुकांत अपयशाला कारणीभूत ठरलेल्या त्रुटींना येणाऱ्या दिवसांत काँग्रेस दूर करेल, असेदेखील ते म्हणाले.
यावेळी गहलोत यांनी राजस्थानबद्दलदेखील चर्चा केली. तेथे काँग्रेसने सुरू केलेल्या सर्व योजनांचा भाजप सरकारने बट्ट्याबोळ केला आहे. आमच्या कार्यकाळात महिलांचा विकास, आरोग्य आणि निवास या क्षेत्रात चांगले काम झाले होते. परंतु विद्यमान सरकार या योजनांना ना बंद करीत आहे ना समोर चालवत आहे. हरित राजस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासदेखील भाजप सरकारला फारशी रुची नाही, असा आरोप त्यांनी केला. परंतु सर्व स्थिती नक्कीच बदलेल, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)