नोटाबंदीच्या धास्तीने मोदी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 04:42 IST2017-02-18T04:42:31+5:302017-02-18T04:42:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर नोटाबंदी लादली. त्यांच्या या निर्णयाचा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून पक्षाच्या होर्डिंगवरून

नोटाबंदीच्या धास्तीने मोदी गायब
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर नोटाबंदी लादली. त्यांच्या या निर्णयाचा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून पक्षाच्या होर्डिंगवरून त्यांचे फोटो गायब करण्यात आले आहेत. लोक नोटाबंदीमुळे नाराज झाल्याचे भाजपाला आता कळले आहे. त्यामुळेच मुंबईतील ८० टक्के होर्डिंगवर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो छापले गेले आहेत, असा दावा काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्विजय सिंग सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रंगशारदा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना, भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात सध्या पाच राज्यांत निवडणुका आहेत आणि सगळीकडे भाजपाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मुंबईतही लोकांना बदल हवा आहे. २० वर्षे एकत्र महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या तसेच राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या दोन्ही पक्षांमध्ये सध्या लुटीच्या हिश्शासाठी संघर्ष सुरूआहे. कोणाला किती हिस्सा मिळावा यासाठीच अत्यंत खालच्या पातळीवर हे दोघे भांडत आहेत. मुंबईकरांनी यापासून सावध झाले पाहिजे, असे दिग्विजय सिंग म्हणाले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना ही खंडणीखोर आणि हफ्तावसुली पार्टी असल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे केवळ आरोपबाजी न करता त्यांनी शिवसेनेवर एफआयआर दाखल करावा, असेही ते म्हणाले. काँग्रेसने मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यास पारदर्शक कारभार कसा असतो हे आम्ही दाखवून देऊ, असेही दिग्विजय सिंग म्हणाले.
तर, निवडणुकीपूर्वी एकमेकांशी भांडणारी शिवसेना, भाजपा निवडणुकीनंतर एकत्र येतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीच ही आमची ‘फ्रेंडली मॅच’ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्षांतील भांडण म्हणजे मुंबईकरांची फसवणूक असल्याचे निरूपम म्हणाले. (प्रतिनिधी)
विश्वास कोण ठेवणार
सध्या मुंबईत सर्वत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत होर्डिंग्ज लावले असून, यात ‘मी शब्द देतो,’ असे म्हटले आहे. मुळात आता लोकांचा नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास उडाला आहे; मग मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर कोण व कसा विश्वास ठेवेल, असा टोला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना हाणला.