मोदींमुळे कृषी अर्थव्यवस्था अडचणीत - पवार
By Admin | Updated: October 10, 2014 05:27 IST2014-10-10T05:26:45+5:302014-10-10T05:27:02+5:30
मोदींनी सत्तेवर येताच डाळिंब, कांदा व धान्य निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव गडगडले आणि या मालासाठी विदेशी बाजारपेठ बंद झाली

मोदींमुळे कृषी अर्थव्यवस्था अडचणीत - पवार
मेहकर (जि़ बुलडाणा) : मोदींनी सत्तेवर येताच डाळिंब, कांदा व धान्य निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव गडगडले आणि या मालासाठी विदेशी बाजारपेठ बंद झाली. कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याचे काम मोदी सरकारच्या निर्णयामुळे झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊसृष्टीमध्ये आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. या वेळी पवार यांनी मोदींवर चौफेर टीका केली. भाजपाची सत्ता आल्यापासून शेतमालाचे भाव कमी झाले आहेत. साखर निर्यातीवर बंदी आणून शेतकऱ्यांच्या संसाराला चटका देण्याचे काम या सरकारने केले आहे. शेतमालाचे भाव वाढवून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज पवार यांनी अधोरेखित केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही भ्रष्टाचारी नेते असल्याचा आरोप भाजपाने केला होता. पक्षाने लगेच चौकशी करून अशा नेत्यांना बाजूला सारले. आता या भ्रष्ट नेत्यांना भाजपाने साथ दिली. हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तर भ्रष्टाचारी आणि भाजपात गेले तर साधूसंत, असा याचा अर्थ होतो का, असा सवालही पवार यांनी केला.
गुजरातमध्ये शिकविला जातो चुकीचा इतिहास
गुजरातमध्ये शालेयस्तरावरील इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव दादोजी कोंडदेव असे छापलेले आहे. ज्या मोदींना छत्रपतींचा इतिहास माहीत नाही, ते महाराष्ट्राच्या दैवताचा मतांसाठी आधार घेत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.