मोदी लाटेत राष्ट्रवादी बचावली, काँग्रेस बुडाली!
By Admin | Updated: May 17, 2014 03:55 IST2014-05-17T03:55:57+5:302014-05-17T03:55:57+5:30
देशभरात नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेक पक्ष आणि नेते बुडाले असले, तरी दक्षिण महाराष्ट्रातील लढविलेल्या तिन्ही जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस बचावली आहे.

मोदी लाटेत राष्ट्रवादी बचावली, काँग्रेस बुडाली!
देशभरात नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेक पक्ष आणि नेते बुडाले असले, तरी दक्षिण महाराष्ट्रातील लढविलेल्या तिन्ही जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस बचावली आहे. याच वेळी तिन्ही जागा गमावून आघाडीतील मित्र पक्ष असलेली काँग्रेस मात्र या लाटेत बुडाली आहे. दक्षिण महाराष्ट्र हा गेली सहा दशके काँग्रेस आणि मित्र पक्षांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या विभागात काँग्रेसचा पराभव म्हणजे दिवास्वप्नच असायचे. पण या वेळी त्यांना धक्का बसला. सोलापुरातून केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे दोन नंबरचे नेते सुशीलकुमार शिंदे, सांगलीतून केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि इचलकरंजीतून माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. ते तिघेही पराभूत झाले. कोल्हापुरातून धनंजय महाडिक, सातार्यातून छत्रपती उदयनराजे आणि माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विजयी लढत दिली. या सहा जागांपैकी हातकणंगलेच्या जागेवर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विद्यमान खासदार होते. माढ्यात तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रतिनिधित्व करीत होते. कॉँग्रेस -राष्टÑवादीच्या या आघाडीविरुद्ध मोदी लाटेचा अचूक लाभ घेत महायुतीने काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार घेत मोठे यश मिळविले.