मोदींनी जरा जपून बोलावे !
By Admin | Updated: October 13, 2015 03:21 IST2015-10-13T03:21:33+5:302015-10-13T03:21:33+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पाकिस्तानात बरेच गैरसमज आहेत, अशी कबुली देतानाच पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री खुर्शिद महसूद कसुरी यांनी मोदी

मोदींनी जरा जपून बोलावे !
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पाकिस्तानात बरेच गैरसमज आहेत, अशी कबुली देतानाच पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री खुर्शिद महसूद कसुरी यांनी मोदी यांना जपून बोलण्याचा आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा शांततेचा मार्ग अनुसरण्याचा सल्ला दिला.
कसुरी यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव्हह्ण या ग्रंथाचे सोमवारी नेहरु सेंटरमध्ये अत्यंत कडक बंदोबस्तात प्रकाशन झाले. त्यावेळी कसुरी बोलत होते. ते म्हणाले की, भारत-पाक या दोन्ही देशांमध्ये अखंड शांतता चर्चा सुरु ठेवणे हेच या समस्येवरील उत्तर आहे. एक नकारात्मक विधान हे अशा चर्चेतून तयार झालेल्या सौहार्दपूर्ण संबंधात मिठाचा खडा टाकू शकते. त्यामुळे मोदी यांनी जपून बोलणे गरजेचे आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी त्यांच्या काळात उभय देशांमधील संबंधातील तणाव दूर करण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना मोदी यांनी त्याच मार्गावरून वाटचाल करावी, असेही कसुरी यांनी सुचवले. मोदी सध्या विकास व पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीची भाषा करीत आहेत. ती जर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये व्हायला हवी असेल तर दोन्ही देशांमध्ये व सीमेवर शांतता प्रस्थापित करायला हवी. कसुरी म्हणाले की, २००६ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व परवेझ मुशर्रफ यांच्यात काश्मीर प्रश्नावर तोडगा निघणार होता. मात्र त्यावेळी उत्तर प्रदेशसह सहा राज्यांच्या निवडणुका असल्याने सिंग यांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर पुन्हा या नेत्यांची भेट होणार होती. परंतु मुशर्रफ यांनी पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना पदच्युत केल्यावरून देशभर वादळ उठल्याने भेट टळली, असा गौप्यस्फोट कसुरी यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
कसुरींचे स्वागत
व्हायला हवे होते
भारतामधून जेव्हा जेव्हा पाकिस्तानमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करायला गेलो तेव्हा प्रचंड स्वागत झाले. आमचे जसे स्वागत झाले तसे ते कसुरी यांचे मुंबईत झाले असते तर अधिक आनंद वाटला असता, अशा शब्दांत अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी खंत व्यक्त केली.
> नेहरू सेंटरला छावणी!
नेहरू सेंटरच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत होती आणि संपूर्ण परिसराची जणू नाकेबंदीच करण्यात आली होती. दोन्ही मार्गांवर बॅरिकेडस् लावण्यात आले होते.
मुख्य सभागृहापर्यंत पोहोचण्याआधी चार ठिकाणी निमंत्रितांची कसून तपासणी करण्यात येत होती. नेहरू सेंटरमध्ये पार्किंगची पुरेशी सुविधा असतानाही वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला.
मुख्य रस्त्यावरील बॅरिकेटस्जवळच वाहने थांबविली होती. त्यानंतर तीन
ठिकाणी प्रत्येक निमंत्रितांची तपासणी करण्यात आली. प्रत्येक टप्यावर आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनाही तैनात केले होते.
आधी पोलिसांची तपासणी त्यानंतर स्वयंसेवकांनी ओळख पटविल्यावरच पुढे
प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक टप्प्यावर तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तैनात केले होते.
सभागृहावर पोलीस सहायुक्तांची नजर
पोलीस पथक, आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे कर्मचारी आणि नेहरू सेंटरच्या सुरक्षा रक्षकांच्या किमान ३ ठिकाणच्या तपासणी दिव्यातून सभागृहात स्थानापन्न झाल्यानंतरही निमंत्रित श्रोत्यांना तपासणीतून सुटका नव्हती.
सभागृहात तर थेट पोलीस सहायुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली. भगव्या रंगाचा टी-शर्ट, राजकीय नेते-कार्यकर्त्यांप्रमाणे भासणारे कपडे परिधान केलेल्या प्रत्येक व्यक्तीला सभागृहाबाहेर काढले.
शिवसेनेशी संबंध नाही अथवा निमंत्रित असल्याची खातरजमा झाल्यानंतरच अशा व्यक्तींना पुन्हा सभागृहात जाण्याची अनुमती देण्यात आली.
>>>> दाऊदबाबत कानावर हात : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकमध्ये आहे का, असा सवाल कसुरी यांना केला गेला असता दाऊद कुठे आहे त्याची आपल्याला काहीच माहिती नाही, असे सांगत कानावर हात ठेवले. आपण विदेशमंत्री होतो गृहमंत्री नव्हे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प सुरु असल्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली.
मुंबई महाराष्ट्रीय तशी आंतरराष्ट्रीय : मुंबई हे शहर महाराष्ट्रीय आहे व त्याचा आपल्याला अभिमान आहे, परंतु त्याचबरोबर हे शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असल्याचे मत आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मुंबई शहर हे सोशिकांचे व उदारमतवादीयांचे शहर आहे व यापुढेही राहणार असल्याचे ते म्हणाले.