मोदींनी महाराष्ट्राऐवजी पाककडे लक्ष द्यावे - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 8, 2014 11:12 IST2014-10-08T09:24:09+5:302014-10-08T11:12:43+5:30
पाकच्या कुरापाती सुरु असताना राज्यातील भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.

मोदींनी महाराष्ट्राऐवजी पाककडे लक्ष द्यावे - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - नियंत्रण रेषेवर पाकच्या कुरापाती सुरु असताना राज्यातील भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्राचे राजकारणनंतरही करता येईल पण मोदींनी आधी पाककडे लक्ष द्यायला हवे असे ठाकरेंनी म्हटले आहे.
भाजपसोबतची २५ वर्ष जुनी युती तुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड सुरु केली आहे बुधवारी ठाकरेंनी पाककडून होणा-या गोळीबारावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. गोळीला गोळीने उत्तर देऊ असा इशारा केंद्र सरकारने गेल्या महिन्यात दिला होता. हे कृतीत कधी उतरणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला आहे. देशाच्या रक्षणासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ५६ इंचाची छातीची गरज आहे की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी लढण्याची इच्छाशक्ती असेल तर छाती मोजायची गरज नाही असा चिमटाही त्यांनी काढला आहे.