मोदींनी यावे आणि विदर्भ देऊन जावे
By Admin | Updated: August 21, 2014 01:19 IST2014-08-21T01:19:14+5:302014-08-21T01:19:14+5:30
भारतीय जनता पक्षाने भुवनेश्वर येथे वेगळ्या विदर्भाचा ठराव केला आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लहान राज्याचे समर्थन केले आहे. एवढेच नव्हे केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी

मोदींनी यावे आणि विदर्भ देऊन जावे
नागपूर : भारतीय जनता पक्षाने भुवनेश्वर येथे वेगळ्या विदर्भाचा ठराव केला आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लहान राज्याचे समर्थन केले आहे. एवढेच नव्हे केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाचे अॅफिडेव्हीट केले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा विदर्भात येत आहे. त्यांनी नागपूरच्या सभेत विदर्भाची घोषणा करावी व पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे.
पंतप्रधान येत असल्याने समितीतर्फे भाजपाने दिलेल्या आश्वासनांचा ५०० फुटाचा बॅनर घेऊन निदर्शने करण्यात येणार आहे. अजनी चौकात दुपारी ३.३० वाजतापासून पंतप्रधान जाईपर्यंत विदर्भवादी शांतपणे निदर्शने करणार असल्याचे समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते, दिलीप नरवडिया, अरुण वनकर, अरुण केदार, शेरखाँ पठाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)