मोदी लाटेत भुजबळ, गावित साफ
By Admin | Updated: May 17, 2014 04:21 IST2014-05-17T04:21:18+5:302014-05-17T04:21:18+5:30
छगन भुजबळ आणि माणिकराव गावितांचा पराभव ही उत्तर महाराष्टÑातील निकालाची खास वैशिष्ट्ये समजावी लागतील. पण, महायुतीने उत्तर महाराष्टÑावर शतप्रतिशत वर्चस्व मिळविले आहे

मोदी लाटेत भुजबळ, गावित साफ
छगन भुजबळ आणि माणिकराव गावितांचा पराभव ही उत्तर महाराष्टÑातील निकालाची खास वैशिष्ट्ये समजावी लागतील. रावेर, जळगाव, धुळे आणि दिंडोरी या जागा कायम राखताना नाशिक व नंदुरबार आपल्याकडे खेचून महायुतीने उत्तर महाराष्टÑावर शतप्रतिशत वर्चस्व मिळविले आहे. कॉँग्रेसचा नंदुरबारचा गड रामनामाच्या लाटेतही टिकून राहिला होता; पण मोदी लाटेने तो उद्ध्वस्त केला. त्याचप्रमाणे नाशिकमधेही भुजबळांच्या सत्तेला सुरुंग लावला. जातीच्या राजकारणातून दुखावलेला मराठा समाज, गुंडापुंडांना आश्रय दिल्याचा आरोप हे भुजबळांच्या पराभवाचे कारण मानले जाते. माणिकरावांचा पराभव हा त्यांची निष्क्रियता आणि विजयकुमार गावितांनी सत्तेच्या बदलत्या वार्याचा घेतलेला वेध आहे, असे म्हणता येईल. दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाण हे विजयी झाले. राष्टÑवादीच्या भारती पवार यांच्याविरोधात त्यांच्या जाऊबाई जयश्री पवार या उतरल्या होत्या. इकडे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांची पकड होती. शिवाय मोदी लाटेचा फायदाही ए.टी. पाटील यांसारख्या निष्क्रिय उमेदवाराला मिळाला. राष्टÑवादीचा प्रभाव असूनही त्या पक्षातील बेदिली सतीश पाटील यांना तारू शकली नाही. धुळ्यात कॉँग्रेसमध्ये एकी असली तरी राष्टÑवादीची बेकी होती. मालेगाव, सटाण्यातील मते अमरिश पटेलांना मिळू शकली नाहीत, त्यामुळे भाजपाचे सुभाष भामरे विजयी झाले.