मोदी म्हणजे हिटलरच !
By Admin | Updated: July 21, 2015 02:11 IST2015-07-21T02:11:34+5:302015-07-21T02:11:34+5:30
सदैव या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर सध्या एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महापौरांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच

मोदी म्हणजे हिटलरच !
मुंबई : सदैव या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर सध्या एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महापौरांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच तोफ डागली आहे. त्यांनी मोदींची तुलना थेट हिलटरशी केली आहे.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्नेहल आंंबेकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत ही काहीशी हिटलरसारखीच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मुळातच शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एक मोठा घटक पक्ष आहे. असे असूनही शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीशी फारसे काही पटत नाही, अशी अवस्था आहे. त्यात आता महापौरांनी थेट मोदींच्या कार्यशैलीवर टीका करीत आणखी वाद ओढावून घेतला आहे. एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत मला आदर आहे. शिवाय स्वत:च्या क्षमतेवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. परंतु काही वेळेला मात्र त्यांचे वागणे मला हिटलरसारखे वाटते, असे म्हणत त्यांनी एका व्यक्तीच्या हातात सत्ता एकवटल्यानंतर असे होणारच, असे म्हणत वादाला आयते निमंत्रण दिले आहे. महापौरपदी विराजमान झालेल्या आंबेकर यांनी याआधीही अशीच उलटसुलट भाषणबाजी करून वाद ओढावून घेतले होते.
मुलाखतीतील काही भागाचा विपर्यास करण्यात आल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत आंबेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.